Vasubaras Mythology: हिंदू धर्मात गायीला गोमाता म्हटले जाते. गाईला धर्मात महत्त्वाचे स्थान आहे. गायीचा सन्मान करण्याचाच वसुबारस हा दिवस आहे. हा सण आश्विन कृष्ण द्वादशीला साजरा केला जातो. या दिवशी गायीला तिच्या पाडसासह पूजतात. वसु म्हणजे द्रव्य किंवा धन आणि त्यासाठी आलेली बारस म्हणजे द्वादशी. म्हणूनच या दिवसला गोवत्स द्वादशी असे म्हटले जाते.पाहू या काय आहे यामागची पौराणिक कथा आणि या दिवसाचं धार्मिक महत्त्व...
आटपाट नगर होतं. तिथं एक कुणब्याची म्हातारी रहात होती. तिला एक सून होती. त्यांच्याकडे गाईगुरं होती. गायी होत्या, तशी म्हशीही होत्या. गव्हाळी, मुगाळई वासरं देखील होती.
तेव्हा आश्विन मास होता. या मासात पहिल्या द्वादशीच्या दिवशी म्हातारी सकाळी उठली आणि ती शेतावर जाऊ लागली. त्यावेळी सासूने सुनेला हाक मारली. मुली, मुली, इकडे ये, असे म्हणताच सून आली. सासू म्हणाली की मी शेतावर जाते. दुपारी येईन. तू माडीवर जा आणि गव्हाचे, मुगाचे दाणे काढ आणि गव्हाळे-मुगाळे शिजवून ठेव.
त्यानंतर सासू शेतावर निघून गेली. सून माडीवर गेली आणि गहू, तसेच मूग काढून ठेवले. खाली आल्यानंतर ती गोठ्यात गेली. गव्हाळी-मुगाळी वासरं उड्या मारत होती. त्यांना सुनेने ठार मारले आणि त्यांना चिरले. त्यानंतर तिने त्यांना शिजवत ठेवून सासूची वाट पाहत बसली. दुपारी सासू घरी परत आली. सुनेनं पान वाढलं. सासूने पाहिलं. तिला तांबडं मांस दिसलं. हे काय आहे, असं तिने सुनेला विचारलं. सुनेने सर्व हकिकत सांगितली. त्यानंतर सासू घाबरली. ही मोठी चूक घडली होती. ती तशीच देवापुढे जाऊन बसली. प्रार्थना केली. देवा हा माझ्या सुनेच्या हातून अपराध घडला. तिला क्षमा कर असे ती म्हणाली. गाई-वाररांनाही जिवंत कर म्हणाली. जर तू त्यांना जिवंत नाही केलंस तर मी संध्याकाळी प्राण देईन असा निश्चय सासूने केला.
त्यानंतर सासू देवापाशी बसून राहिली. देवाने तिचा एकनिश्चय पाहिला. निष्कपट अंतरंग पाहिलं. नंतर संध्याकाळी गायी आल्या. हंबरडा फोडू लागल्या तशी देवाला चिंता वाटू लागली. हिचा निश्चय ढळणार नाही, असं देवाला वाटलं. त्यानंतर देवानं वासरं जिवंत केली. ती उड्या मारतच प्यायला गेली. गायींचे हंबरडे बंद झाले. म्हातारीला आनंद झाला. सुनेला आश्चर्य वाटलं. हे पाहून सर्वांनाच आनंद झाला. नंतर म्हातारीने गायी-गुरांची पूजा केली. स्वयंपाक करून नैवेद्य दाखवला. देवाचे आभार मानले. त्यानंतर आपण जेवली. आनंदी झाली. तसे तुम्ही आम्ही होऊ. हा साठां उत्तराची कहाणी पाचां उत्तरी, देवाब्राह्मणाच्या दारी, पिंपळाच्या पारीं, गायींच्या गोठी सुफळ संपूर्ण.
> गोवत्स एकादशीला गहू मूग खाल्ले जात नाहीत.
> दूध आणि दुधाचे पदार्थ खात नाहीत
> तळलेले आणि तव्यावरील पदार्थ खाणे वर्ज्य आहे.
> या दिवसापासून अंगणात रांगोळी काढली जाते. या दिवसापासून दिवाळीची सुरुवात होते.
> घरी गुरे, वासरे असणार्यांकडे ह्या दिवशी पुरणा-वरणाचा स्वयंपाक केला जाते. त्याचा नैवेद्य दाखवला जातो.
> सौभाग्यवती स्त्रिया एकभुक्त राहतात आणि सायंकाळी संवत्स म्हणजे वासरासह असलेल्या गायीचे पूजन करतात.
> सवाष्ण बायका गायीच्या पायावर पाणी घालतात.
> नंतर हळद-कुंकू, फुले, अक्षता वाहतात. त्यानंतर फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात.
> निरांजनाने ओवाळणी केली जाते. त्यानंतर केळीच्या पानावर पुरणपोळीसारखे पदार्थ वाढून गायीला खाऊ घालतात.
> स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगाची भाजी खातात. हेच खाऊन स्त्रिया उपवास सोडतात.
संबंधित बातम्या