१८ व्या लोकसभेत खासदार चिराग पासवान यांनी केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतली. लोकसभा निवडणुकीपासून चिराग पासवान प्रचंड चर्चेत आहेत. काही वर्षांपूर्वी अभिनेता असलेले चिराग आता नेता म्हणून लोकप्रिय होत आहेत. सतत त्यांच्याबाबत काही ना काही गोष्टी समोर येत असतात. राजकीय कारकीर्दच नव्हे तर त्यांच्या स्टाईल आणि लूकचीदेखील चर्चा होत असते. दरम्यान चिराग पासवान आपल्या हातात काळा आणि पिवळा धागा आवर्जून बांधतात असे अनेकांच्या लक्षात आले. परंतु ज्योतिष्यांच्या मते हा धागा स्टाईल किंवा फॅशनसाठी नसून त्यामागे धार्मिक आणि ज्योतिषीय कारण आहे. आज आपण त्याबाबतच जाणून घेणार आहोत.
एका वृत्तवाहिनीच्या रिपोर्ट्सनुसार प्रसिद्ध ज्योतिषी मूगेंद्र चौधरी यांनी याबाबत माहिती देत सांगितले आहे की, पिवळ्या धाग्याचा संबंध बगलामुखी देवीशी असतो. देवी बगलामुखी ही दशमहाविद्येतील आठवी महाविद्या आहे. बगलामुखीदेवी तंत्र क्रियास्तंभनची देवी आहे. ज्योतिष अभ्यासानुसार शत्रूंचा नाश, वाणीत यश आणि वादविवादात विजय मिळावा यासाठी बगलामुखी देवीची पूजा केली जाते.वास्तविक सुरुवातीला या देवीचे नाव 'वल्गा' मुखी होते. मात्र कालांतराने या देवीला 'बगलामुखी' देवी म्हणून ओळखले जाऊ लागले. वल्गा म्हणजे एखाद्या गोष्टीवर लगाम घालणे होय. वैदिक शास्त्रानुसार पृथ्वीच्या घटकाचा रंग पिवळा मानला जातो. पृथ्वीच्या गुणधर्माबाबत सांगायचे झाले, तर त्यामध्ये स्थिरता हा गुण आढळतो.
बागलामुखी देवीच्या आशीर्वादाने शत्रूंचा नाश होत असल्याची मान्यता आहे. जर तुम्ही बगलामुखीदेवीला प्रसन्न केले तर तुम्हाला आयुष्यात पुढे जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही कारण तुमचे शत्रू तुमच्यासमोर उभे राहू शकत नाहीत अशी मान्यता आहे. ज्योतिषी मृगेंद्र चौधरी सांगतात की, बगलामुखी देवीला ब्रह्मास्त्राचीदेवी देखील म्हटले जाते. बगलामुखी देवीच्या आराधनेने तुमच्या यशाची वाट मोकळी होते. या ज्योतिषांच्या मते मंत्री चिराग पासवान यांच्या हातात असलेला धागासुद्धा बगलामुखी देवीच्या आराधनेचाच आहे. मात्र चिराग पासवान यांनी याबाबत कधीच कोणतीही माहिती दिलेली नाहीय. त्यामुळे ठामपणे हे सांगणे अगदी कठीण आहे.
ज्योतिषीय माहितीनुसार, बगलामुखी देवीची आराधना करताना पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे लागतात. भोजनात पिवळे पदार्थ खावे लागतात, प्रसादात पिवळे पदार्थ देवीला अर्पण करावे लागतात. बगलामुखी देवीची आराधना किंवा विधी पूर्ण झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या हातात पिवळ्या रंगाचा कलावा अर्थातच पिवळ्या रंगाचा धागा बांधला जातो. मान्यतेनुसार, कलावा संरक्षण सूत्राप्रमाणे कार्य करतो. जोपर्यंत व्यक्तीला अपेक्षित परिणाम मिळत नाही तोपर्यंत तो हा कलावा हातात बांधून ठेवला जातो.
ज्योतिष शास्त्रानुसार काळा धागा वाईट नजर दूर करण्यासाठी तसेच शनि आणि राहूला बळकटी देण्यासाठी बांधला जातो. मंत्री चिराग पासवानच नव्हे तर अनेक लोक आपल्या हातात अशाप्रकारचा काळा धागा बांधलेले दिसून येतात.
संबंधित बातम्या