मराठी बातम्या  /  धर्म  /  Ramzan Eid 2023 : यंदा कधी पाळला जाणार रमजान महिना?, का ठेवले जातात रमजान महिन्यात रोजे?

Ramzan Eid 2023 : यंदा कधी पाळला जाणार रमजान महिना?, का ठेवले जातात रमजान महिन्यात रोजे?

Dilip Ramchandra Vaze HT Marathi
Mar 16, 2023 12:13 PM IST

Ramadan Start Date : पवित्र रमजानचा महिना हा मुस्लिम बांधवांसाठी अत्यंत महत्वाचा महिना म्हणून साजरा केला जातो. या दरम्यान ठेवले जाणारे रोजे नेमके कशासाठी असतात. काय आहे रमजान आणि रोजे यांचं महत्व हे जाणून घेऊया.

रमजानचा महिना
रमजानचा महिना (हिंदुस्तान टाइम्स)

रमजानचा महिना मुस्लिम बांधवांसाठी एक अत्यंत पवित्र महिना मानला जातो. या महिन्याची इस्लाममध्ये आपली अशी एक वेगळी ओळख आहे. रमजानचे रोजे ठेवणं हे प्रत्येक मुस्लिमाचं आद्यकर्तव्य मानलं जातं. आज आपण रमजान म्हणजे काय आणि त्याची सुरुवात कशी होते आणि रोजे कसे ठेवले जातात याबाबत सविस्तर माहिती घेणार आहोत.

ट्रेंडिंग न्यूज

रमजान म्हणजे काय?

इस्लाम कॅलेंडरचा नववा महिना म्हणजे रमजान. मुस्लिमांसाठी हा सर्वात पवित्र महिना आहे. असे म्हटले जाते की रमजानमध्ये केलेल्या उपासनेचं फळ इतर महिन्यांच्या तुलनेत अनेक पटीने जास्त आहे. यंदा हा पवित्र महिना २४ मार्चपासून सुरू होत आहे. संपूर्ण ३० दिवस या काळात उपवास पाळले जातात.

रमजान महिन्यात रोजे कसे ठेवले जातात?

रमजानच्या महिन्यात मुस्लिम बांधव संपूर्ण दिवसभर काहीही न खाता पिता फक्त अल्लाहची इबादत करतात. यासोबतच तरावीहची नमाज आणि कुराण शरीफचे पठण केले जाते. रमजानमध्ये जकातीलाही अनन्य साधारण महत्व प्राप्त झालं आहे. जकात म्हणजे आपण मेहनत करुन कमावलेल्या पैशातला काही भाग गरीबांसाठी किंवा गरजूंसाठी दान करणे. जकात हा इस्लामच्या पाच महत्वपूर्ण स्तंभांपैकी एक असल्याचे म्हटले जाते. रमजानमध्ये उपवास, प्रार्थना आणि कुराण पठण यासोबतच जकात आणि फित्रा देण्याचेही विशेष महत्त्व आहे.

रमजानच्या वेळेस उपवास ठेवण्याचं महत्व?

रमजान हा अत्यंत आनंदाचा महिना किंवा भक्तीचा महिना म्हणून साजरा केला जातो. या महिन्यात मुस्लिम बांधव दिवसभर काहीही न खाता पिता कडक रोजे, म्हणजेच उपवास करतात. संध्याकाळी सूर्यास्तानंतर रोजा सुटतो, ज्याला इफ्तार असं म्हटलं जातं. इफ्तारच्या वेळेस आधी खजूर खाल्ला जातो आणि त्यानंतर विविध फळं खाऊन रोजा सोडला जातो. रमजाच्या वेळेस रात्री मुंबईतल्या गल्ल्या वेगवेगळ्या खाद्यपदार्थांनी गजबजलेल्या पाहायला मिळतात. रात्री उपवास सोडल्यानंतर पुन्हा सकाळी सूर्योदयापूर्वी सहरी करुन पुन्हा दिवसभराच्या अत्यंत कडक रोजाला म्हणजेच उपवासाला सुरूवात होते. यादरम्यान अल्लाहचं नाव ओठी ठेवलं जातं. रोजे सुरू असताना मुस्लिम बांधवांना खोटं बोलणं, खोटं वागणं किंवा काहीही वाईट कृती करणं किंवा पाहाणं हे निषिद्ध मानलं गेलं आहे.

रमजान महिन्यात रोजा ठेवल्याने मिळणारं फळ अनेक पटींनी जास्त असतं आणि आपल्या हातून कळत नकळत घडलेल्या पापांची क्षमा यावेळेस अल्लाह देतो असा मुस्लिम बांधवांचा ठाम विश्वास आहे.

हिंदू नववर्ष २२ मार्च २०२३ रोजी गुढीपाडव्याने साजरं केलं जाईल आणि त्यानंतर जेमतेम दोनच दिवसात म्हणजेच २४ मार्च २०२३ रोजी पवित्र रमजान महिन्याची सुरुवात होणार आहे. मार्च, एप्रिल आणि मे हे महिने कडक उन्हाळ्याचे महिने मानले जातात. अशात हे रमजान महिन्यातले रोजे अत्यंत कसोटीचे म्हणून पाहिले जातात.

 

 

 

WhatsApp channel

विभाग