उत्तर भारतात आजपासून श्रावण महिना सुरू झाला आहे. महाराष्ट्रात १८ जुल रोजी श्रावणाला सुरूवात होईल. श्रावणाच्या प्रत्येक सोमवारी भगवान शिवाची पूजा करणं महत्वाचं मानलं जातं. यंदा अधिकमास आल्यामुळे श्रावण तब्बल ५९ दिवसांचा असणार आहे. अशात उत्तर भारतात श्रावणात कावड यात्रेचं महत्व आहे. ही कावड यात्रा काय आहे, याचा इतिहास काय आहे हे आपण जाणून घेऊया.
समुद्र मंथनातून मिळालेलं अमृत देवांनी प्यायलं आणि ते अमर झाले. मात्र त्याच समुद्रमंथनातून निघालेलं विष कोण पिणार असा प्रश्न जेव्हा निर्माण झाला तेव्हा भगवान महादेवांनी हे आव्हान स्विकारलं होतं आणि त्यांनी हे हलाहल प्राशन केलं होतं. मात्र हे विष प्राशन केल्यानंतर महादेव त्याच्या प्रभावाने तडफडू लागले. हे विष पचवणं त्यांच्यासाठी आव्हानापेक्षा कमी नव्हतं. मात्र त्यांची होत असलेली तडफड त्यांच्या परमभक्ताला पाहावली नाही.
आपल्या आराध्याची होत असलेली तडफड पाहून रावणाने मग महादेवांवर कावडीने पाणी आणून ओतायला सुरूवात केली. अनेक वर्ष रावणाने हे काम केलं आणि अखेर महादेवांची तडफड थांबली आणि ते पूर्ववत झाले. या नंतर महादेवांना नीलकंठ या नावाने ओळखलं जाऊ लागलं आणि रावणाला पहिला कावड वाहाणाऱ्याचा मान मिळाला.
बांबूच्या दोन टोकांना दोन घागरी बांधलेल्या असतात. भाविक त्या घागरी गंगाजलाने भरतात आणि मग चालत आपली कावड यात्रा सुरू करतात. काही भाविक अनवाणीही या प्रवासात सहभागी होतात. काही भाविक यात्रा पूर्ण करण्यासाठी सायकल, स्कूटर, मोटारसायकल, जीप किंवा मिनी ट्रकचाही वापर करतात. हे सर्व करताना एक गोष्ट जी अत्यंत महत्वाची असते ती म्हणजे प्रवासात कोणत्याही वेळेस या पाण्याने भरलेल्या कावडीचा स्पर्श जमीनीला होऊ द्यायचा नसतो.
विशेषत: उत्तर भारतात गौमुख, गंगोत्री, ऋषिकेश आणि हरिद्वार या विविध पवित्र स्थळांवरून गंगेचे पाणी आणण्यासाठी. या प्रवासात भाविक पवित्र गंगा नदीत स्नान करतात आणि कावड खांद्यावर घेऊन जातात.कंवर यात्रेच्या विधीला खूप महत्त्व आहे. या प्रकारच्या उपासनेचा सराव करून, कंवरी लोक आध्यात्मिक विराम घेतात आणि त्यांच्या प्रवासादरम्यान शिव मंत्र आणि स्तोत्रांचा जप करतात. कंवर यात्रा पूर्ण केल्याने कंवर्यांना भगवान शंकराकडून दैवी आशीर्वाद प्राप्त होतो आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, असाही विश्वास आहे.
आणखी एका मान्यतेनुसार भगवान परशुराम, जे भगवान शिवाचे महान भक्त म्हणून ओळखले जातात त्यांनी प्रथम ही कावड यात्रा श्रावण महिन्यात केली. तेव्हापासून ही कावड यात्रा संतांनी सुरू केली आणि १९६० सालापासून ही कावड यात्रा सर्वसामान्य व्यक्तीही करू लागल्या. कावड यात्रा प्रामुख्याने श्रावण महिन्यात साजरी केली जाते. हा मेळा 'श्रावण मेळा' म्हणून ओळखला जातो. या कावड यात्रेत केवळ पुरुषच नाही तर महिला भाविकही सहभागी होतात.
यंदा होणाऱ्या कावड यात्रेसाठी वाहतुकीतही मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आला आहे. दरवर्षी वाहतूक पोलिसांकडून कावड यात्रेच्या दरम्यान वाहतुकीचे मार्ग बदलले जातात.