What is sallekhana Vidhi : जैन धर्मातील दिगंबर पंथियांचे संत आचार्य विद्यासागर महाराज (Acharya Vidyasagar Maharaj) यांचे निर्वाण झाले. छत्तीसगड येथील डोंगरगड या ठिकाणी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रविवारी (१८ फेब्रुवारी) रात्री २ वाजून ३५ मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या समाधीमरणाने संपूर्ण जैन समाजासह त्यांचा भक्तगण शोकसागरात बुडाला.
दरम्यान, समाधी घेणे हा संत परंपरेचा एक भाग आहे. जैन संत आचार्य विद्यासागर यांनीही जैन धर्मातील प्रसिद्ध सल्लेखाना पद्धतीद्वारे आपल्या प्राणांचा त्याग केला. यानंतर सल्लेखाना पद्धत काय आहे? आणि जैन धर्मात सल्लेखानाचे महत्त्व काय आहे? याबाबत आपण जाणून घेणार आहोत.
जैन धर्मात समाधी घेण्याच्या पद्धतीला सल्लेखाना म्हणतात. जैन मान्यतेनुसार, सुखाने आणि दुःखाशिवाय मृत्यू सहन करण्याच्या प्रक्रियेला सल्लेखाना म्हणतात. या काळात, जेव्हा एखादी व्यक्ती मरणार असते किंवा आपला मृत्यू जवळ आल्याची भावना होते, तेव्हा ती व्यक्ती अन्न आणि पाणी पूर्णपणे सोडून देते. या काळात साधक आपले पूर्ण लक्ष देवावर केंद्रित करतो आणि स्वर्गप्राप्ती करतो. मौर्य वंशाचा संस्थापक चंद्रगुप्त मौर्य यांनीही सल्लेखाना पद्धतीने बलिदान दिले होते.
थोडक्यात, सल्लेखाना या प्रथेमध्ये स्वेच्छेने शरीर सोडण्यासाठी अन्न आणि पाण्याचा त्याग केला जातो. 'सल्लेखाना' हा शब्द 'सत' आणि 'लेखन' म्हणजे 'चांगुलपणाचा लेखाजोखा' या दोन शब्दांनी मिळून बनलेला आहे.
जैन धर्माच्या मान्यतेनुसार, जेव्हा एखाद्या व्यक्तीला दुष्काळ, म्हातारपण किंवा रोगाचा सामना करावा लागतो आणि या समस्येवर कोणताही इलाजदिसत नाही किंवा होत नाही. तेव्हा त्या व्यक्तीने सल्लेखाना परंपरेद्वारे शरीराचा त्याग केला पाहिजे. जैन धर्मात ही प्रथा संथारा, संन्यास-मारण, समाधी-मारण, इच्छा-मारन इत्यादी अनेक नावांनी ओळखली जाते.
जैन धर्मात असे मानले जाते, की या पद्धतीद्वारे मनुष्य आपल्या कर्माचे बंधन कमी करून मोक्ष प्राप्त करू शकतो. जीवनात स्वतःने केलेल्या चांगल्या आणि वाईट कर्मांसाठी देवाकडून क्षमा मागण्याचा हा एक मार्ग आहे. किंबहुना, मृत्यूला शांततेने स्वीकारण्याचीही ही एक प्रक्रिया आहे.
सल्लेखाना पद्धतीने प्राणत्याग करण्यापूर्वी गुरूंची परवानगी घ्यावी लागते, त्यानंतरच ही प्रथा करता येते. पण एखाद्याचे गुरु हयात नसतील तर त्यांच्याकडून प्रतीकात्मक परवानगी घेतली जाते. या सल्लेखाना विधी दरम्यान, ४ किंवा अधिक लोक समाधी घेणाऱ्या व्यक्तीच्या सेवेत गुंतलेले असतात. हे लोक त्या व्यक्तीला योग-ध्यान, जप-तपश्चर्या वगैरे करायला लावतात आणि शेवटच्या क्षणापर्यंत त्या व्यक्तीची सेवा करण्यात तल्लीन राहतात.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या