होळीपूर्वी होलाष्टक सुरू होते. होलाष्टकापासून ते होलिका दहनपर्यंत कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. होळीच्या तिथीची मोजणी होलाष्टाकाच्या आधारे केली जाते, अशी मान्यता आहे.
होलाष्टक म्हणजे होळीचे आठ दिवस. होलिका दहनाच्या आठ दिवस आधीपासून होलाष्टक सुरू होते. फाल्गुन शुद्ध अष्टमीपासून सुरू झालेले होलाष्टक होलिकादहनापर्यंत सुरू राहते. होलाष्टकाच्या काळात शुभारंभ करणे किंवा १६ संस्कार करणे अशुभ समजले जाते.
पंचांगानुसार शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी १६ मार्च रोजी रात्री ९ वाजून ३९ मिनिटांनी सुरू होत असून, १७ मार्च रोजी सकाळी ९ वाजून ५३ मिनिटांनी समाप्त होईल. सनातन धर्मात उदया तिथीला विशेष महत्त्व आहे. अशा परिस्थितीत १७ मार्चपासून होलाष्टक सुरू होईल आणि २४ मार्चला संपेल. यानंतर २५ मार्च रोजी होळी साजरी केली जाईल.
ज्योतिष शास्त्राप्रमाणे, होलाष्टकच्या प्रथम दिवशी अर्थात फाल्गुन शुद्ध अष्टमीला चंद्र, नवमीला सूर्य, दशमीला शनी, एकादशीला शुक्र, द्वादशीला गुरु, त्रयोदशीला बुध, चतुर्दशीला मंगळ आणि पौर्णिमेला राहु हे ग्रह उग्र स्वरुपात असतात.
या ग्रहांचा प्रभाव मानवावर पडल्यामुळे मस्तिष्काचे सर्व विकार, शंका आणि द्विधा मनस्थिती यांमुळे माणूस चिडचिडा होत असतो. मन अशांत राहते. अडचणी, समस्या निर्माण होतात. याचा परिणाम हातात घेतलेल्या कार्यांवर होतो आणि त्यात यश मिळण्याऐवजी अपयश येते. घरात नकारात्मकता, अशांती, दुःख आणि क्लेशदायक वातावरण तयार होते. या गोष्टींमुळे होळीपूर्वीचे आठ दिवस अशुभ मानले जातात.
गर्भाधान, विवाह, गर्भाधारणाच्या तिसर्या महिन्यात करण्यात येणारे संस्कार, नामकरण, चूडाकरण, विद्यारंभ, गृह प्रवेश, गृह निर्माण, गृह शांती, हवन-यज्ञ कर्म आदी संस्कार या होलाष्टकाच्या कालावधीत करू नयेत, असे सांगितले जाते.
होलाष्टकाच्या काळात भगवान श्रीकृष्णाची पूजेचं महत्त्व आहे. या आठ दिवसात कृष्णाच्या विविध रुपांचं पूजन केलं जातं. फळ, फूल, अबीर गुलाल, धूप दीप यांनी पूजन करावं. तसेच मंत्रांचा जप करावा. यामुळे जीवनातील सर्व संकट दूर होतं. सुख आणि सौभाग्य प्राप्ती होते.