होळीचा उत्सव अवघ्या काही दिवसांवर आलाय. ६ मार्च रोजी होलिका दहन केलं जाईल आणि ७ मार्च रोजी धूळवड किंवा रंगोत्सव साजरा केला जाईल. मात्र होळी आणि रंगपंचमीच्या उत्सवांमागच्या धार्मिक कथा काय आहेत याची माहिती आहे का. आज आपण पुन्हा एकदा या निमित्ताने आपल्या कल्पनाशक्तीला उजाळा देऊ.
काय आहे भक्त प्रल्हादाची कथा
राजा हिरण्यकश्यपू हा एक अतिशय शक्तिशाली राक्षस होता आणि त्याला त्याच्या शक्तीचा खूप अभिमान होता. त्याच्या सामर्थ्याच्या बळावर, त्याने आपल्या प्रजेला देव म्हणून त्याची पूजा करण्याचा आदेश दिला आणि जे त्याची पूजा करणार नाही त्यांना हिरण्यकश्यपू शिक्षा करत असे. राजा हिरण्यकश्यपूला प्रल्हाद नावाचा मुलगा होता पण तो भगवान श्रीविष्णूंचा निस्सीम भक्त होता. राजाला प्रल्हादची भक्ती आवडत नसे. सर्व प्रकारे हिरण्यकश्यपूनेप्रल्हादाला समजावून पाहिलं मात्र त्याचा प्रल्हादावर काहीच परिणाम होत नसल्याचं पाहून त्याने आपल्या बहिणीला म्हणजेच होलिकेला, जिला अग्नीचं वरदान होतं तिला प्रल्हादाला आपल्या मांडीवर बसव आणि अग्नी प्रज्वलित कर म्हणजे तो त्या अग्नीत जळून खाक होईल असा आदेश दिला. आदेशानुसार होलिकेने प्रल्हादाला आपल्या मांडीवर बसवलं आणि तिनं अग्नीदेवाचं स्मरण केलं. अग्नी प्रज्वलित झाला खरा मात्र प्रल्हादाच्या भक्तीनं होलिकेचं वरदान संपलं आणि होलिका त्यात जळीन खाक झाली. पुढे श्रीविष्णूंनी नृसिंह अवतार घेत हिरण्यकश्यपूचा वध केला हे आपल्याला माहिती असेलच.
कामदेवांना भोलेनाथांनी का केलं होतं भस्म
पौराणिक कथेनुसार हिमालयाची कन्या पार्वतीला महादेवांशी लग्न करायचे होते. परंतु शिव घोर तपश्चर्येत मग्न होते. अशा स्थितीत देवी-देवतांच्या सांगण्यावरून कामदेवांनी फुलांचा बाण मारून भगवान शिवांची तपश्चर्या मोडली, त्यामुळे शंकराने क्रोधित होऊन आपला तिसरा डोळा उघडला आणि त्यातून निघालेल्या अग्नीने कामदेवाला भस्म झाले. यानंतर भगवान शंकराने माता पार्वतीला पाहिले आणि माता पार्वतीला पत्नी म्हणून स्वीकारले. या कथेत, कामदेव भस्म झाल्यानंतर प्रतिकात्मकपणे वासनायुक्त आकर्षण अग्नीत जाळून खाक झाले. जेव्हा कामदेव भस्म झाले तेव्हा त्याची पत्नी रतीने देवदेवतांकडे, कामदेवच्या आयुष्याची याचना केली. महादेवाने कामदेवला पुनरुज्जीवित करण्याचा आशीर्वाद दिला, तो दिवस होळीचा होता. कामदेवांच्या पुनरुज्जीवनाच्या आनंदात रंगोत्सव खेळण्यात आला होता.