विवाह पंचमी २०२४ दिनांक व महत्त्व : हिंदू धर्मात विवाह पंचमीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. विवाह पंचमी मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरी केली जाते. याच दिवशी प्रभू राम आणि माता सीतेचा विवाह झाला होता. विवाह पंचमी हा श्रीराम आणि माता सीतेच्या विवाहाचा वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षी विवाह पंचमी ०६ डिसेंबर २०२४, शुक्रवार रोजी आहे. पण तुम्हाला माहित आहे का की, विवाह पंचमीच्या दिवशी अनेक ठिकाणी विवाह केले जात नाहीत. धार्मिक दृष्टीकोनातून हा दिवस खूप महत्वाचा आहे परंतु मिथिलांचल आणि नेपाळमध्ये या दिवशी विवाह केले जात नाहीत.
माता सीता ही मिथिलाची कन्या असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे मातेच्या दु:खाविषयीही मिथिलावासी संवेदनशील असल्याचे सांगितले जाते. १४ वर्षे वनवास भोगल्यानंतरही गरोदर सीतेला प्रभू रामाने सोडून दिले, अशा प्रकारे राजकुमारी सीतेला महाराणी होण्याचा आनंद मिळाला नाही. त्यामुळे विवाह पंचमीच्या दिवशी लोक आपल्या मुलींचे लग्न करणे टाळतात. माता सीतेप्रमाणे आपल्या मुलीचे वैवाहिक जीवन दु:खांनी भरलेले राहील, अशी भीती यामागे सतावते.
विवाह पंचमी २०२४ शुभ मुहूर्त - पंचमी तिथी ५ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजून ४९ मिनिटांनी सुरू होईल आणि ६ डिसेंबर २०२४ रोजी १२ वाजून ७ मिनिटांनी संपेल.
उन्नती : सकाळी ०८ वाजून १८ मिनिटे ते ०९ वाजून ३६ मिनिटे
अमृत - सर्वोत्तम : सकाळी ०९ वाजून ३६ मिनिटे ते १० वाजून ५३ मिनिटे
शुभ - उत्तम : दुपारी १२ वाजून ११ मिनिटे ते ०१ वाजून २९ मिनिटे
विवाह पंचमीचे महत्त्व - विवाह पंचमीच्या दिवशी लोक आपापल्या घरात भगवान राम आणि माता सीतेची विधिवत पूजा करतात. विवाह पंचमीच्या दिवशी राम-सीतेची मनोभावे पूजा केल्याने जीवनात सुख-समृद्धी येते, असे सांगितले जाते.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती केवळ धार्मिक श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)