शास्त्रांमध्ये विश्वकर्मा यांचा जन्म भाद्रपद वद्य संक्रांतीला झाला होता, असे म्हटले आहे. परंतु, देशभरात यामध्ये मतभिन्नता आढळते. देशातील काही ठिकाणी दिवाळीत, तर काही ठिकाणी माघ महिन्यात विश्वकर्मा जयंती साजरी केली जाते. वर्ष २०२४ मध्ये २२ फेब्रुवारी २०२४ रोजी विश्वकर्मा जयंती साजरी केली जात आहे.
समस्त प्राणीसृष्टीचा विश्वकर्मा जनक मानला गेला आहे. एक वैदिक देवता असा उल्लेखही काही ठिकाणी आढळतो. पुराणे व महाभारत यात विश्वकर्मांना देवांचा महान शिल्पशास्त्रज्ञ मानले आहे. ब्रह्मांच्या इच्छेनुसार विश्वकर्मांनी नवीन औजारे शोधलीत. सौर उर्जा वापरण्याचे व त्या उर्जेच्या नियंत्रणाचे ज्ञान त्यांना प्राप्त होते. सूर्य शक्तिचा वापर करून त्यांनी विष्णू, शिव व इंद्रासाठी अनुक्रमे सुदर्शन चक्र, त्रिशूळ व विजय रथ निर्माण केला. शस्त्रे व अस्त्रे, अलंकार, पुष्पक विमान आदींची निर्मिती त्यांनी केली. हजारो यंत्र-तंत्र, शस्त्रास्त्रे व साधनांची त्यांनी निर्मिती केली. सोनार, लोहार, सुतार, कुंभार, कासार समाजबांधव त्यांना आपले दैवत मानतात. कलियुगातही विश्वकर्मा यांचे पूजन अत्यंत लाभदायक मानले गेले आहे.
विश्वकर्मा यांची पूजा केली जाते, स्मरण केले जाते. या दिवशी उपलब्ध सर्व शस्त्रांची, दररोज उपायोगात येणारी यंत्रे, तंत्रे यांचे पूजन केले जाते कलियुगात आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येक जण लॅपटॉप, मोबाइल आणि टॅबलेट अगदी दररोज वापरतो. हीदेखील यंत्रे आणि शस्त्र आहे. त्यामुळे या यंत्रांचे पूजन करणे लाभदायक ठरते, असे सांगितले जाते. विश्वकर्मा पूजनाच्या निमित्ताने या यंत्र, शस्त्रांप्रति कृतज्ञता व्यक्त करावी, असे सांगितले जाते.
विश्वकर्मा पूजनात कलश, अक्षता, फुले, मिठाई, फळ, सुपारी, धूप, दीप, रक्षासूत्र, दही आणि विश्वकर्मा यांचा फोटो आदी पूजासाहित्य एकत्र करावे. यांनतर अष्टदलाची रांगोळी काढावी. यानंतर एका चौरंगावर विश्वकर्मा यांचा फोटो स्थापन करावा. विश्वकर्मा यांची पंचोपचार पूजा करावी. यानंतर अक्षता, चंदन, हळद-कुंकू अर्पण करावे. फुले, फळे, धूप, दीप, नैवेद्य अर्पण करावे. विश्वकर्मा यांचे स्मरण करावे. यानंतर कारखाना, कार्यालयातील सर्व अवजारे, हत्यारे, शस्त्रे, यंत्रे यांचे पूजन करावे. या सर्वांना गंधाक्षदा अर्पण करावे.
यावेळी ॐ पृथिव्यै नमः ॐ अनंतम नमः ॐ कूमयि नमः ॐ श्री सृष्टतनया सर्वसिद्धया विश्वकर्माया नमो नमः, असे मंत्र म्हणून कलशातील पाणी अवजारे, शस्त्रे, यंत्रे यांच्यावर शिंपडावे. यानंतर सर्व उपस्थितांनी विश्वकर्मांची आरती करावी आणि प्रसादाचे वाटप करावे.
विश्वकर्मा यांच्या जन्माबाबत शास्त्रांमध्ये बरीच मतमतांतरे आहेत. एका शास्त्रानुसार, ब्रह्म देवाचे पुत्र धर्म, धर्माचे पुत्र वास्तूदेव आहे. वास्तूदेव आणि अंगिरसी यांचे पुत्र विश्वकर्मा आहेत. स्कंद पुराणाप्रमाणे, धर्म ऋषींचे आठवे पुत्र प्रभास होते. प्रभास यांचा विवाह बृहस्पती ऋषींच्या भगिनी भुवना ब्रह्मवादिनी यांच्याशी झाला. भुवना ब्रह्मवादिनी यांचे पुत्र विश्वकर्मा आहेत. तर, महाभारतातही विश्वकर्मांचा उल्लेख आढळतो. वराह पुराणानुसार, ब्रह्म देवांनी विश्वकर्मा यांना पृथ्वीवर जाण्याची आज्ञा केली.