Festivals This Week, 4 to 10 March 2024 : मार्चचा हा आठवडा व्रत आणि सणांच्या दृष्टीने अतिशय शुभ मानला जातो. या आठवड्यात विजया एकादशी व्रत, महाशिवरात्री व्रत, फाल्गुन अमावस्या यासह अनेक प्रमुख व्रत आणि सण साजरे केले जाणार आहेत.
सोबतच, या आठवड्यात बुध मीन राशीत आणि शुक्र कुंभ राशीत प्रवेश करेल. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यातील प्रमुख सणांबद्दल जाणून घेऊया.
फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला विजया एकादशी म्हणतात. असे मानले जाते की या दिवशी व्रत करून सर्व विधीपूर्वक भगवान विष्णूची आराधना केल्याने सर्व कार्यात विजय प्राप्त होतो आणि व्यक्ती जन्म-मृत्यूच्या बंधनातून मुक्त होतो. पौराणिक कथेनुसार या दिवशी एकादशीचे व्रत करून पांडवांनी कौरवांवर विजय मिळवला होता.
पंचांगानुसार, दरवर्षी माघ वद्य चतुर्दशी तिथीला महाशिवरात्रीचा सण साजरा केला जातो. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचा शुभ विवाह झाला होता, अशी धार्मिक मान्यता आहे. तेव्हापासून हा उत्सव महाशिवरात्री या नावाने प्रचलित झाला आणि शिवभक्तांसाठी मोठा उत्सव बनला.
या दिवशी शिव आणि पार्वतीची पूजा केल्यास विशेष फल प्राप्त होते. योगायोगाने या दिवशी शुक्र प्रदोष व्रतही पाळले जाते. पंचकही संध्याकाळी ७.१५ वाजता सुरू होईल.
फाल्गुन अमावास्येला सनातन धर्मात फार महत्त्व दिले जाते. याला भूतडी किंवा भूमवती अमावस्या असेही म्हणतात. या दिवशी गंगा किंवा इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने सर्व पापे धुतली जातात अशी मान्यता आहे. या दिवशी दान करण्याला सुद्धा खूप महत्व आहे .
सोबतच या तिथीला पितरांची पूजा करणे विशेष फायदेशीर मानले जाते. पितृदोष शांती, कालसर्प दोष शांती इत्यादी करून तुम्ही तुमच्या पूर्वजांपासून मुक्ती मिळवू शकता. या दिवशी पवित्र ठिकाणी स्नान केल्याने खूप फायदेशीर फळ मिळते.