Vat Savitri Vrat 2024 : दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या तिथीला वट सावित्रीचा उपवास केला जातो. हे व्रत केल्याने पतीचे आयुष्य वाढते आणि वैवाहिक जीवनात मधुरता राहते, असे मानले जाते. वट सावित्री व्रताच्या दिवशी वटवृक्षाची पूजा करण्याची परंपरा आहे. या दिवशी विवाहित स्त्रिया शृंगार करून स्वत:ला सजवतात आणि निर्जल उपवास करतात आणि विधीनुसार वटवृक्षाची पूजा करतात.
चला तर मग जाणून घेऊया या वर्षी कोणत्या दिवशी वट सावित्री व्रत पाळले जाणार आहे आणि पूजेचा शुभ मुहूर्त कोणता असेल. या व्रताचे महत्त्वही आपण येथे जाणून घेणार आहोत.
धार्मिक मान्यतांनुसार, यमराजांनी माता सावित्रीचे पती सत्यवान यांचे वटवृक्षाखाली प्राण परत केले होते आणि त्यांना १०० पुत्रांचा आशीर्वाद दिला. तेव्हापासून वट सावित्री व्रताची आणि वटवृक्षाची पूजा करण्याची परंपरा सुरू झाल्याचे सांगितले जाते. असे मानले जाते की वट सावित्री व्रताच्या दिवशी वटवृक्षाची पूजा केल्यास भगवान यमराजासह त्रिमूर्तीचा आशीर्वाद प्राप्त होतो.
ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या तिथी ५ जून २०२४ रोजी संध्याकाळी ७:५४ वाजता सुरू होईल आणि ६ जून २०२४ रोजी संध्याकाळी ६:०७ वाजता समाप्त होईल. उदय तिथीनुसार ६ जून रोजी वट सावित्री व्रत केले जाणार आहे. विवाहित महिला सकाळी ११:५२ ते दुपारी १२:४८ या वेळेत वट सावित्रीची पूजा करू शकतात.
तर वट पौर्णिमेचे दुसरे व्रत ज्येष्ठ पौर्णिमेला पाळले जाते. त्यानुसार, ज्येष्ठ पौर्णिमा २१ जून २०२४ रोजी सकाळी ०७ वाजून ३१ मिनिटांनी सुरू होईल. आणि २२ जून रोजी सकाळी ०६ वाजून ३७ मिनिटांनी समाप्त होईल. त्यानुसार, २१ जून २०२४ रोजी वट सावित्री पौर्णिमा साजरी होईल. या दिवशी पूजेची वेळ सकाळी ०५ वाजून २४ मिनिटे ते १० वाजून ३८ मिनिटांपर्यंत आहे.
वट सावित्रीचे व्रत जेष्ठ महिन्यातील अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी पाळले जाते. अमावस्या तिथीला वट सावित्री व्रत ६ तारखेला आहे, तर पौर्णिमेला वट सावित्री व्रत २१ जूनला पाळले जाईल. उत्तर प्रदेश, दिल्ली, मध्य प्रदेश, हरियाणा आणि पंजाबमध्ये अमावस्या तिथीला वट सावित्री व्रत पाळले जाते.
गुजरात आणि महाराष्ट्रात पौर्णिमेच्या दिवशी वट सावित्री व्रत करण्याची परंपरा आहे.
संबंधित बातम्या