मराठी बातम्या  /  धर्म  /  Vat Purnima 2023 : जेव्हा यमराज आपल्याच वरदानाच्या जाळ्यात अडकतात

Vat Purnima 2023 : जेव्हा यमराज आपल्याच वरदानाच्या जाळ्यात अडकतात

Dilip Ramchandra Vaze HT Marathi
Jun 03, 2023 10:03 AM IST

Satyavan-Savitri Katha : आपल्या नवऱ्याचे प्राण यमाकडून एका हुशार स्त्री ने कसे परत आणले हे सांगणारी कथा आहे सत्यावान आणि सावित्रीची कथा.

काय आहे वटसावित्रीची कथा
काय आहे वटसावित्रीची कथा (HT)

आपल्या पतीचे प्राण यमाकडून परत आणणाऱ्या सावित्रीच्या व्रताला म्हणजेच वटसावित्री व्रताला आजपासून आरंभ होत आहे. वटसावित्री व्रतारंभ म्हणून या व्रताकडे पाहिलं जातं. मात्र वटसावित्रीची नेमकी कथा काय आहे, सावित्रीने कसे आपले प्राण यमाच्या तावडीतून परत आणले, सत्यवानाला कोणता श्राप होता हे सारं काही आज आपण जाणून घेणार आहोत.

त्याचं झालंअसं की, भद्र राज्यात अश्वपती राजा राज्य करत होता. त्याला सावित्री नावाची कन्या होती. सावित्री उपवर झाल्यानं त्याने योग्य वर शोधायला सुरूवात केली. सावित्री ही अत्यंत नम्र आणि गुणी मुलगी होती. सावित्रीच्या सांगण्यावरून शाल्व नावाच्या सत्यवान या राजकुमाराशी सावित्रीचा विवाह लावण्यात आला.

मात्र राजा धृमत्सेन त्यावेळेस आपलं राज्य शत्रूकडून हरला होता आणि तो जंगलात राहात होता. त्यामुळे सावित्रीही लग्नानंतर जंगलात राहावयास लागली. नारद मुनींना सत्यावान दीर्घकाळ जगणार नसल्याचं माहित होतं त्यांनी तशी कल्पनाही सावित्रीला दिली होती. मात्र हे माहिती असूनही सावित्रीने सत्यवानाशी लग्न केलं.

एकदा जंगलात सत्यवान लाकडं तोडत होता आणि सावित्रीही त्याच्याबरोबर होती. सत्यवानाला भोवळ आली आणि तो बेशुद्ध झाला. सत्यवान बेशुद्ध झाल्याचं पाहाताच यमराज तिथे आले आणि सत्यवानाचे प्राण ते घेऊन जाऊ लागले. इतक्यात सावित्री तिथे पोहोचली आणि तिने यमराजाला असं न करण्याची विनंती केली. मात्र धर्माने यमराज बाधले गेले असल्याने त्यांनी सावित्रीची विनंती धुडकावून लावली. मात्र पती सोबत नसेल तर माझेही प्राण घेऊन मला माझ्या पतीसोबत घेऊन चला असा हट्ट सावित्रीने लावला.

तिच्या विनंतीला नाही म्हणून यमराज कंटाळले आणि त्यांनी सावित्रीला कोणतेही तीन वर मागावयास सांगितले. त्यावर सावित्रीने माझ्या सासऱ्यांची दृष्टी परत यावी अशी मागणी केली आणि यमराजांनी ती मागमी मान्य केली. मग सावित्रीने आम्ही हरलेलं राज्य आम्हास परत मिळावं अशी दुसरी मागणी केली, यमराजांनी याही मागणीला संमती दर्शावली.

आता अजून एक वर आणि सत्यवानाचे प्राण यमराज सुखरूप घेऊन जाऊ शकणार होते. अशा विचारात असतानाच सावित्रीने तिसरा वर मागितला. मला पुत्रप्राप्ती होऊ दे, सत्यवानाचा वंश पुढे चालू दे. यमराजांनी तथास्तू म्हटले खरे मात्र आपल्याच जाळ्यात सावित्रीने आपल्याला ओढलं याची जाणीव त्यांना झाली.

यमराजांना सावित्रीच्या हुशारीचं कौतुक वाटलं आणि त्यांनी तथास्तू म्हटल्याने सत्यवान पुन्हा एकदा जीवंत झाला. ज्या वडाच्या झाडाखाली हा प्रकार घडला त्या वडाला मग वटसावित्रीच्या दिवशी पूजले गेले आणि आजही ती परंपरा कायम आहे.

WhatsApp channel