Vasubaras : वसुबारस कधी आहे? तारीख, तिथी, शुभ मुहूर्त, शुभ योग आणि महत्त्व जाणून घ्या
मराठी बातम्या  /  धर्म  /  Vasubaras : वसुबारस कधी आहे? तारीख, तिथी, शुभ मुहूर्त, शुभ योग आणि महत्त्व जाणून घ्या

Vasubaras : वसुबारस कधी आहे? तारीख, तिथी, शुभ मुहूर्त, शुभ योग आणि महत्त्व जाणून घ्या

Published Oct 22, 2024 10:53 AM IST

Vasubaras 2024 Date And Time In Marathi : दिव्यांनी अंधार दूर करून साजरा केला जाणारा सण म्हणजे दिवाळी होय. दिवाळी सणाची सुरवात वसुबारस या सणाने होते. दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस होय. जाणून घ्या वसुबारस कधी आहे? तारीख, तिथी, शुभ मुहूर्त, शुभ योग आणि महत्व.

वसुबारस २०२४
वसुबारस २०२४

हिंदू धर्मात दिवाळी किंवा दीपावली या सणाला सण-उत्सवाचा राजा मानले जाते. प्रत्येकाला दिवाळी या सणाची उत्सुकता असते. अंधार दूर करून प्रकाश निर्माण करणारा हा सण प्रत्येकासाठी खास असतो. या सणाची सुरवात वसुबारस म्हणजेच गोवत्स द्वादशीने होते. वसुबारस हा गायीच्या पूजेला समर्पित दिवस आहे आणि दिवाळीचा पहिला दिवस आहे. जाणून घ्या वसुबारस कधी आहे? तारीख, तिथी, शुभ मुहूर्त, शुभ योग आणि महत्व.

देशातील बहुतांश ठिकाणी वसुबारसेपासून दिवाळीला सुरुवात होते, असे मानले जाते. यंदा सोमवार , २८ ऑक्टोबर रोजी अश्विन कृष्ण एकादशीला गोवत्स द्वादशी, वसुबारस आणि रमा एकादशी आहे, त्यामुळे यंदाच्या वसुबारसला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे.

वसुबारसच्या दिवशी गायी व वासरांची पूजा केली जाते. हा एक अनोखा उत्सव आहे कारण या दिवशी पवित्र गायींचे आभार आणि कृतज्ञता व्यक्त केले जाते. हा सण नंदिनी व्रत या नावानेही ओळखला जातो. हा दिवस अश्विन महिन्यातील द्वादशी (कृष्ण पक्ष) या हिंदू तिथीला पाळला जातो. हा दिवस सवत्सधेनूची पूजा करण्याचा आहे.

गोवत्स द्वादशी तिथी प्रारंभ आणि समाप्ती वेळ

गोवत्स द्वादशी प्रारंभ २८ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजून ५१ मिनिटांनी

गोवत्स द्वादशी समाप्ती २९ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजून ३१ मिनिटांनी.

गोवत्स द्वादशीचे महत्व

असे सांगितले जाते की, समुद्रमंथनातून नंदिनी, शुभदा, सुरभी, सुशीला आणि बहुला या पाच कामधेनू जन्माला आल्या. त्यांच्या पूजनासाठी हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी स्त्रिया आपल्या संततीच्या सुखासाठी आणि दीर्घायुष्यासाठी उपवास करतात. असंही मानलं जातं की जे जोडपं गाईची पूजा करतात आणि या दिवशी व्रत ठेवतात त्यांना लवकरच अपत्यप्राप्ती होते. या दिवशी, भक्त कोणतेही दुग्धजन्य पदार्थ किंवा गव्हाचे पदार्थ खाणे टाळतात. हा सण भारतातील अनेक भागांमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो आणि जे लोक तो करतात त्यांना आनंद आणि समृद्धी प्राप्त होते.

वसुबारसच्या दिवशी गाईची पाडसासह संध्याकाळी पूजा करतात. घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे. वसु म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी म्हणून या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात.

Whats_app_banner