vastu tips for plot in marathi : सध्याच्या काळात नवीन घर किंवा प्लॉट खरेदी करताना अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. कुटुंबातील लोकांना सुख-शांती आणि समृद्धीसाठी प्लॉटचा आकार, तेथील रचना आणि परिसरातील अनेक गोष्टी कारणीभूत असतात. त्यामुळं तुम्ही नवीन प्लॉटची खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी वास्तू टिप्सचा आधार घ्यायलाच हवा. त्यामुळं तुम्हाला भविष्यातील अडचणी, कौटुंबिक कलह आणि अन्य वाद टाळता येवू शकतात. नवीन प्लॉट खरेदी करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी, याबाबत जाणून घेऊयात.
प्लॉटचं मुख हे उत्तर-पूर्व दिशेला असायला हवं. तर मागची बाजू ही दक्षिण पश्चिमेला असायला हवी. कारण त्यामुळं कुटुंबियांमध्ये कोणताही वाद होत नाही. शेरमुखी प्लॉट खरेदी केल्यास त्यामुळं मालकाला भविष्यात मोठी मालमत्ता आणि चांगले रिटर्न्स मिळत असतात. कोणताही प्लॉट किंवा मोठा भूखंड खरेदी करताना त्याचा आकारावर भविष्यातील यशापयश ठरलेलं असतं. व्यावसायिक आणि निवासी कारणांसाठी प्लॉट खरेदी करत असाल तर त्यासाठी प्लॉटच्या कोपरे अपूर्ण किंवा गहाळ असायला नको. भविष्यातील सुख-शांती आणि समृद्धीसाठी ईशान्य किंवा पूर्वाभिमुख प्लॉटची निवड करायला हवी.
प्लॉट खरेदी करताना तिथं आसपास कोणतीही स्मशानभूमी असायला नको. याशिवाय रुग्णालय किंवा पोलीस ठाण्यापासून लांब असलेलाच प्लॉट विकत घ्यायला हवा. कारण त्यामुळं तुमच्या घरात कुणालाही सुख लाभत नाही. सतत वाद होवून नशीब साथ देत नाही.
प्लॉटवर काळी किंवा लाल माती असल्यास त्यामुळं मोठा फायदा होत असतो. नवीन घर बांधल्यास तिथं झाडांची मोठ्या प्रमाणात वाढ होत असते. पांढरी माती, रेती किंवा दलदलीच्या मातीवरील प्लॉट्सची खरेदी करणं टाळायला हवं. कारण त्यामुळं तुमच्या घराची बांधणी कमकुवत होवू शकते.
आयताकृती भूखंड निवासी किंवा व्यावसायिक जागेत पूर्णता आणतात. चौकोनी भूखंड शांती आणि आनंदाशी निगडीत आहे, तर आयताकृती भूखंड आरोग्य आणि समृद्धी निर्माण करत असतात. उत्तर किंवा दक्षिण उतार असलेली मालमत्ता खरेदीसाठी अतिशय योग्य समजली जाते. त्यामुळं खरेदीसाठी नेहमीच आयताकृती प्लॉटची निवड करायला हवी.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून ‘हिंदुस्तान टाइम्स मराठी’ याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या