हिंदू धर्मात राशीभविष्य, अंकशास्त्र, वास्तूशास्त्र या शास्त्रांना विशेष महत्व आहे. बहुतांश लोक आपल्या आयुष्यातील विविध समस्या दूर करण्यासाठी या शास्त्रांचा आधार घेत असतात. आपल्या स्वप्नांचे घर असावे असे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते. मात्र हिंदू धर्मात घर बांधताना किंवा घर खरेदी करताना वास्तूशास्त्रचा सल्ला घेतला जातो. वास्तूशास्त्रानुसार प्रत्येक दिशा कोणत्या ना कोणत्या घटकाचे प्रतिनिधित्व करत असते. ज्याप्रमाणे आपले शरीर पंच तत्वांनी बनलेले असते, त्याचप्रमाणे आपले घरसुद्धा पंच तत्वांवर आधारित असते. त्यामुळेच सुखीसमाधानी आयुष्य जगण्यासाठी आपले घर दोषमुक्त असावे. हेच वास्तूदोष दूर करण्याचे काम वास्तूशास्त्र करते. त्यामुळेच या शास्त्राला अनन्यसाधारण महत्व आहे.
वास्तू शास्त्रात प्रामुख्याने घराच्या मुख्य दरवाजापासून ते घरातील स्वयंपाक खोली, बाथरुम या सर्वांच्या दिशेचा आणि स्थानाचा अभ्यास केला जातो. घरातील प्रत्येक गोष्टीचे स्थान आणि दिशा या शास्त्रात निश्चित असते. या नियमांनुसार आपल्या घराची रचना केल्यास घरात सुखसमृद्धी आणि लक्ष्मी येते. आज आपण आपल्या घराचा मुख्य दरवाजा कोणत्या दिशेला हवा याबाबत जाणून घेणार आहे. वास्तूशास्त्रात प्रामुख्याने आपल्या घराचा मुख्य दरवाजा उत्तर किंवा पूर्व दिशेला स्थित असावा असा नियम आहे. मात्र ज्योतिषशास्त्रात हे नियम काहीसे बदलतात. ज्योतिषशास्त्रात राशीनुसार घराचा मुख्य दरवाजा कोणत्या दिशेला असावा याबाबत सल्ला देण्यात आला आहे. जाणून घेऊया राशीनुसार मुख्य दरवाजा नेमक्या कोणत्या दिशेला असावा.
ज्योतिषशास्त्रानुसार जर तुमच्या घरातील प्रमुख व्यक्तीची राशी कर्क, वृश्चिक किंवा मीन असेल तर तुमच्या घराचा दरवाजा पूर्व दिशेला असायला हवा. असे असल्यास तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते, घरात सुखसमृद्धी येते. शिवाय घरात नेहमीच लक्ष्मीचा वास राहतो.
जर तुमच्या घरातील कुटुंब प्रमुखाची राशी वृषभ, तूळ आणि कुंभ यापैकी एक असेल तर, तुमच्या घराचा मुख्य दरवाजा पश्चिम दिशेला असायला हवा. असे असल्यास तुमच्या घरासाठी ते अत्यंत लाभदायक ठरते. घरात कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही. तुमच्या घराकडे धन आकर्षित होते.
तुमच्या घरातील प्रमुख व्यक्तीची राशी जर मेष, सिंह आणि धनु यापैकी एखादी असेल तर तुमच्या घरातील मुख्य दरवाजा उत्तर दिशेला असायला हवा. असे असल्यास तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही. घरात लक्ष्मी वास करते. घरात आपापसांत प्रेम आणि माया राहते.
तसेच तुमच्या कुटुंबातील मुख्य व्यक्तीची रास मिथुन, कन्या किंवा मकर यापैकी एखादी असेल तर तुमच्या घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला असायला हवा. असे असल्यास तुमच्यासाठी अत्यंत फलदायी ठरते.
वास्तूशास्त्रानुसार सामन्यतः घरातील मुख्य दरवाजा उत्तर किंवा पूर्व दिशेला असणे शुभ असते. शिवाय घरातील दरवाजांची संख्या सम प्रमाणात असली पाहिजे. २, ४, ६, ८, इत्यादी. परंतु १०, २० किंवा ३० अशी असायला नको. तसेच घरातील दरवाजे किंवा खिडक्या पश्चिम किंवा दक्षिण दिशेला अजिबात असू नयेत. मुख्य प्रवेशद्वार दुहेरी अर्थातच दोन फळीचा असायला हवा. मुख्य दरवाजा उघडताना त्यातून कर्कश आवाज यायला नको. या बाबींवर लक्ष दिल्यास तुमच्या घरात लक्ष्मी वास करते. शिवाय घरात सुखसमृद्धी नांदते.
संबंधित बातम्या