Vastu Tips : घड्याळ नेहमी या दिशेला लावा, बंद पडलेलं घड्याळ घरात ठेवू नका; सुख-शांती गायब होईल
मराठी बातम्या  /  धर्म  /  Vastu Tips : घड्याळ नेहमी या दिशेला लावा, बंद पडलेलं घड्याळ घरात ठेवू नका; सुख-शांती गायब होईल

Vastu Tips : घड्याळ नेहमी या दिशेला लावा, बंद पडलेलं घड्याळ घरात ठेवू नका; सुख-शांती गायब होईल

Feb 19, 2024 10:15 PM IST

Vastu Tips : घराच्या किंवा ऑफिसच्या भिंतीवर किंवा टेबलावर बंद पडलेले घड्याळ नसावे. जर बॅटरीवर चालणाऱ्या घड्याळाचा सेल डिस्चार्ज झाला असेल तर नवीन सेल टाकून तो ताबडतोब सुरू करा.

Vastu Tips
Vastu Tips (AFP)

वास्तू शास्त्रानुसार घर, ऑफिस, दुकान किंवा व्यवसायाच्या ठिकाणी योग्य ठिकाणी घड्याळ ठेवणे हे प्रगतीचे आणि शुभाचे सूचक आहे. काळ सतत फिरत असतो, त्यामुळे चालते घड्याळ योग्य दिशेला लावले तर त्या घड्याळाकडे पाहणाऱ्याचे नशीबही फिरत राहते. 

घराच्या किंवा ऑफिसच्या भिंतीवर किंवा टेबलावर बंद पडलेले घड्याळ नसावे. जर बॅटरीवर चालणाऱ्या घड्याळाचा सेल डिस्चार्ज झाला असेल तर नवीन सेल टाकून तो ताबडतोब सुरू करा.

घड्याळ काही कारणाने बंद पडले असेल किंवा तुटले-फुटले असेल तर ते लवकर दुरुस्त करा, अन्यथा ते घड्याळ भंगारवाल्यांना विका. 

विशेष म्हणजे, अनेकदा असे दिसून आले आहे, की लोकांना त्यांच्या जुन्या घड्याळांबद्दल भावनिक ओढ असते किंवा घड्याळ चांगल्या आठवणींशी जोडलेले असते. त्यामुळे ते जुने घड्याळ घरातून काढून टाकावेसे वाटत नाही.

पण ज्यांना जीवनात सतत प्रगती हवी आहे त्यांनी घरात बंद पडलेले घड्याळ कोणत्याही परिस्थितीत ठेवणे टाळावे.

घड्याळ दक्षिण दिशेला लावू नये

मृत्यूचा देवता यमराज हा दक्षिण दिशेचा स्वामी मानला जातो, त्यामुळे दक्षिणेकडे तोंड करून घड्याळात वेळ पाहणे अशुभ मानले जाते. दक्षिण दिशेला घड्याळ कधीही ठेवू नये, या दिशेला घड्याळ ठेवल्याने घरातील सदस्यांच्या प्रगतीमध्ये बाधा येते आणि घरातील प्रमुखाच्या आरोग्यावर परिणाम होतो.

घड्याळ दरवाजाच्या अगदी वर ठेवू नका, घड्याळ दारावर ठेवल्याने नकारात्मक उर्जेचा प्रवाह येतो, ज्यामुळे अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते.

वास्तुशास्त्रानुसार, भिंतीवर घड्याळ लावण्याची सर्वात शुभ दिशा पूर्व आणि उत्तर आहे. कारण पूर्व आणि उत्तर ही वाढीची दिशा मानली जाते. त्यामुळे घर किंवा ऑफिसमध्ये घड्याळ नेहमी पूर्व आणि उत्तर दिशेच्या भिंतीवर लावावे. 

घड्याळ मागे-पुढे करू नये

तसेच, अनेक जण आपल्या घरच्या घडाळ्याचे काटे काही मिनिटे मागे किंवा काही मिनिटे पुढे सरकवतात. घड्याळाचे काटे काही मिनिटांनी मागे फिरवणाऱ्यांचा युक्तिवाद असा आहे, की असे केल्याने ते लवकर घर सोडू शकतात आणि विलंब न लावता त्यांच्या ठिकाणी पोहोचू शकतात.

पण फेंगशुईनुसार घरातील घड्याळ वेळेच्या मागे जाणे चांगले मानले जात नाही. त्यामुळे घड्याळाची वेळ नेहमी बरोबर असली पाहिजे, वेळ पुढे किंवा मागे नसावी. योग्य वेळ वर्तमानात जगायला शिकवते. 

फेंगशुईनुसार, कामाची क्षमता वाढवण्यासाठी आणि घरातील ऊर्जा संतुलित करण्यासाठी, एक मधुर संगीताचे घड्याळ शुभ दिशेला लावावे. सुरेल संगीताचे घड्याळ लावल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते आणि घड्याळाच्या मधुर आवाजाने घरातील वातावरण प्रसन्न राहते.

 

 

 

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner