Vasant Panchami In Marathi : हिंदू धर्मात माघ महिन्याला सणांचा महिना म्हणतात, कारण या महिन्यात माघी गणेश जयंती, गुप्त नवरात्री असे मोठे सण साजरे केले जातात. या काळात, वसंत पंचमीचा सण देखील याच महिन्यात येतो, जो संगीताची देवी सरस्वतीच्या पूजेला समर्पित आहे.
माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी सरस्वती पूजन म्हणजेच वसंत पंचमी साजरी केली जाते. या दिवसापासून वसंत ऋतूला सुरुवात होते. यंदा वसंत पंचमीबाबत संभ्रम आहे. यावर्षी पंचमी तिथी २ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजून १४ मिनिटांनी सुरू होत असून ३ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजून ५२ मिनिटांपर्यंत चालणार आहे. उदया तिथीनुसार वसंत पंचमी २ फेब्रुवारी रोजी साजरी केली जाईल. देशाच्या काही भागात २ फेब्रुवारीला तर काही भागात ३ फेब्रुवारीला वसंत पंचमी साजरी केली जाणार आहे.
वसंत पंचमीचा दिवस देवी सरस्वतीला समर्पित आहे. या दिवशी देवी सरस्वतीची पूजा केली जाते. देवी सरस्वतीला ज्ञान, संगीत, कला, विज्ञान आणि हस्तकलेची देवी मानले जाते. वसंत पंचमीचा दिवस सर्व शुभ कार्यांसाठी योग्य मानला जातो. त्यामुळे वसंत पंचमीचा दिवस अबुझ मुहूर्त म्हणून प्रसिद्ध असून नवीन कामे सुरू करण्यासाठी चांगला मानला जातो.
वसंत पंचमी ही माता सरस्वती जयंती म्हणून साजरी केली जाते. ही सरस्वती देवीची जयंती आहे. म्हणून या दिवशी देवी सरस्वतीची पूजा केली जाते आणि तिच्याकडून बुद्धी प्राप्त व्हावी म्हणून प्रार्थना केली जाते. वसंत पंचमीचा सण विद्यार्थ्यांसाठी खास असतो.
सकाळी स्नान केल्यानंतर पूजेच्या ठिकाणी एका चौरंगावर पिवळे वस्त्र पसरवावे, त्यावर सरस्वती देवीचे चित्र किंवा मूर्ती ची प्रतिष्ठापना करावी. यानंतर कलश, गणपती आणि नवग्रहाची पूजा करून देवी सरस्वतीची पूजा करावी. मिठाई अर्पण करून आरती करावी.
या दिवशी पिवळे कपडे परिधान करून खिचडी बनवून वाटण्याची परंपरा आहे. या दिवशी शुभ कार्याची सुरुवात होते. वसंत पंचमी हा स्वयंसिद्ध मुहूर्त म्हणूनही मानला जातो. या दिवशी अनेक शुभ गोष्टीही करता येतात. गृहप्रवेश, वाहन खरेदी, घर खरेदी, व्यवसाय किंवा नवीन रोजगार सुरू करणे, साखरपुडा आणि विवाह अशी शुभ कामे करता येतील. या दिवशी लोक पिवळे अन्न बनवून दान ही करतात.
संबंधित बातम्या