Kal Bhairav Temple News In Marathi : वाराणसीच्या कालभैरव मंदिरात केक कापतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये एक महिला मंदिरात केक कापताना दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी आपला आक्षेप व्यक्त केला आहे. त्याचबरोबर काशी विद्वत परिषदेनेही या व्हिडिओवर आक्षेप नोंदवला आहे. केक कापताना काल भैरव मंदिरात उपस्थित असलेल्या महंतांना नोटीस पाठवण्याची तयारी विद्वत परिषद करत आहे असे सांगितले जात आहे.
उत्तर प्रदेशातील वाराणसी या प्राचीन शहराला मंदिरांचे शहर म्हटले जाते. इथल्या प्रत्येक मंदिराला पौराणिक महत्त्व आहे. काशीच्या कालभैरव मंदिरासंबंधीही अनेक श्रद्धा आहेत. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले काशी विश्वनाथ हे स्वतः काशीचे राजा आहेत, तर त्यांच्या वतीने कालभैरवाची कोतवाल आणि नगराचा सेनापती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सोशल मीडिया स्टार्सही या मंदिरात येऊन दर्शनाचा लाभ घेतात.
कालभैरव मंदिरातून सोशल मीडिया स्टार्स महिला इनफ्लुंएसरचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये महिला मंदिरात केक कापताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. गर्भगृहातील केक कापण्याचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर लोकांनी त्यावर आक्षेप नोंदवला आहे. गेल्या शुक्रवारी ती महिला तिच्या वाढदिवसासाठी कालभैरव मंदिरात पोहोचली होती.
मंदिरात पोहोचल्यानंतर महिलेने आधी पूजा केली आणि नंतर केक कापला. यावेळी महिलेने स्वतःचा व्हिडिओही बनवला होता, जो आज सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे मंदिराचे महंत आणि जबाबदार लोकांनी केक कापण्यापासून महिलेला रोखले नाही.
हा व्हिडिओ व्हायरल होताच भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे. असे कृत्य करणे अत्यंत दुःखद असल्याचे ते म्हणतात. कालभैरव मंदिराच्या गर्भगृहासमोर ही घटना घडली तेव्हा मंदिराचे पुजारीही तेथे होते. आता मंदिराचे महंत सांगत आहेत की, त्या लोकांना केक कापण्यास आणि व्हिडीओ बनवण्यास मनाई करण्यात आली होती, पण त्यांना ते मान्य नव्हते.
काशी विद्वत परिषदेने हे प्रकरण गांभीर्याने घेत हे शास्त्रीय कायद्याच्या विरुद्ध असल्याचे म्हटले आहे. विद्वत परिषदेचे सरचिटणीस राम नारायण द्विवेदी हे त्यावेळी मंदिरात असलेल्या कालभैरव मंदिराच्या पूजाऱ्यांना नोटीस पाठवणार आहेत. मंदिर प्रशासन आता मंदिरात व्हिडिओ बनवणे आणि फोटो काढण्यावर बंदी घालणार असल्याची चर्चा आहे.