Vaikuntha Chaturdashi : वैकुंठ चतुर्दशी कधी आहे? जाणून घ्या तिथी, शुभ योग आणि धार्मिक महत्त्व
मराठी बातम्या  /  धर्म  /  Vaikuntha Chaturdashi : वैकुंठ चतुर्दशी कधी आहे? जाणून घ्या तिथी, शुभ योग आणि धार्मिक महत्त्व

Vaikuntha Chaturdashi : वैकुंठ चतुर्दशी कधी आहे? जाणून घ्या तिथी, शुभ योग आणि धार्मिक महत्त्व

Nov 12, 2024 01:24 PM IST

Vaikuntha Chaturdashi 2024 : दरवर्षी देव दिवाळीच्या एक दिवस अगोदर वैकुंठ चतुर्दशी साजरी केली जाते. यावर्षी वैकुंठ चतुर्दशी १४ नोव्हेंबरला आहे. हा दिवस विष्णू आणि महादेवाच्या उपासनेसाठी समर्पित आहे. जाणून घ्या तिथी, शुभ योग आणि धार्मिक महत्त्व.

वैकुंठ चतुर्दशी २०२४
वैकुंठ चतुर्दशी २०२४

हिंदू धर्मात दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्दशी तिथीला वैकुंठ चतुर्दशी साजरी केली जाते. यावर्षी वैकुंठ चतुर्दशी १४ नोव्हेंबर रोजी साजरी केली जाणार आहे. हा दिवस विष्णू आणि महादेवाच्या उपासनेसाठी समर्पित आहे. वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी शंकर विष्णूकडे येऊन त्यांना पुन्हा कारभार सोपवतात व स्वतः कैलास पर्वतावर तपस्येसाठी जातात. या दिवशी 'हरिहर भेट' म्हणजे विष्णू आणि शंकराची भेट होते, असं मानलं जातं.

धार्मिक मान्यतेनुसार, वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी विष्णू आणि शिवाची पूजा केल्याने उपासकाला स्वर्ग प्राप्त होण्यास मदत होते. शेवटी भगवान विष्णूच्या निवासस्थानी स्थान मिळते आणि या दिवशी दान आणि धर्माचे दहा यज्ञांसारखे पुण्यफळ मिळते. वैकुंठ चतुर्दशी हा एकमेव दिवस आहे जेव्हा शिवाला बेलपत्र आणि विष्णूला तुळशीपत्र अर्पण केले जाते. जाणून घेऊया वैकुंठ चतुर्दशीची नेमकी तिथी, शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व.

वैकुंठ चतुर्दशी कधी आहे?

पंचांगानुसार कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाची चतुर्दशी तिथी १४ नोव्हेंबर रोजी सकाळी ०९ वाजून ४३ मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी १५ नोव्हेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ०६ वाजून १९ मिनिटांनी संपेल. तर १४ नोव्हेंबर ला वैकुंठ चतुर्दशी साजरी केली जाणार आहे.

वैकुंठ चतुर्दशीला आहेत अनेक शुभ योग : 

यावर्षी वैकुंठ चतुर्दशी ३ शुभ योगांमध्ये साजरी केली जाणार आहे. या दिवशी सिद्धी योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि रवियोग तयार होत आहेत.

सर्वार्थ सिद्धी योग - सकाळी ०६.३५ ते १२.३३,

रवियोग - ०६:३५ ते १२:३३, १५ नोव्हेंबर

सिद्धी योग सकाळी ११:३० पर्यंत

वैकुंठ चतुर्दशीचे महत्त्व : 

वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी विष्णू आणि महादेवाची पूजा केली जाते. या दिवशी भगवद्गीता आणि श्रीसूक्ताचे पठण केले जाते. असे मानले जाते की विष्णूचा मंत्र आणि स्तोत्र पठण केल्याने साधकाला वैकुंठ धामची प्राप्ती होते. असेही मानले जाते की, या दिवशी कमळाच्या फुलाने पूजा केल्यास विष्णू प्रसन्न होतात आणि भक्तांवर आपला आशीर्वाद ठेवतात.

जो कोणी वैकुंठ चतुर्दशीला भगवान विष्णूची पूजा करतो, त्याला स्वर्ग प्राप्त होतो. आयुष्याच्या शेवटी त्याला भगवान विष्णूचे निवासस्थान असलेल्या वैकुंठामध्ये स्थान मिळते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. वैकुंठ चतुर्दशीचा दिवस हा सामान्य स्त्री-पुरुषांसाठी विष्णूचा आशीर्वाद मिळविण्याचे सर्वोत्तम साधन आहे.

टीप : ही माहिती केवळ श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Whats_app_banner