उत्पत्ति एकादशी २०२४ : प्रत्येक महिन्यात दोन एकादशी तिथी येतात. पहिली शुक्ल पक्षात आणि दुसरी कृष्ण पक्षात. प्रत्येक एकादशी तिथीची वेगवेगळी नावे आणि महत्व असते. महिन्यातील अकराव्या तिथीला एकादशी म्हणतात. कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला उत्पत्ति एकादशी संबोधले जाते.
दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या एकादशी तिथीला उत्पन्न किंवा उत्पत्ति एकादशी साजरी केली जाते. हा दिवस विष्णूसह देवी एकादशीच्या पूजेसाठी समर्पित आहे. एकादशी ही एक देवी असून, तिचा अवतार भगवान श्री विष्णूंमुळे झाला होता. एकादशी देवी कार्तिक वद्य एकादशी दिवशी प्रकट झाली होती. यामुळे कार्तिक वद्य एकादशीचे नाव उत्पत्ती एकादशी असे पडले. या दिवसापासून एकादशीचे व्रत सुरु झाले, असे सांगितले जाते.
हिंदू पंचांगानुसार, यावर्षी उत्पत्ति एकादशी मंगळवार २६ नोव्हेंबरला आहे. या दिवशी विष्णू आणि एकादशी देवीच्या पूजेसह काही गोष्टींची काळजी घेणे महत्वाचे मानले जाते. चला जाणून घेऊया उत्पत्ति एकादशीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये?
एकादशीव्रताच्या दिवशी तुळशीची पाने तोडणे निषिद्ध मानले जाते. त्यामुळे विष्णूच्या पूजेसाठी एकादशीव्रताच्या एक दिवस अगोदर तुळशीचे पान तोडून ठेवावे.
एकादशीच्या व्रतात केस आणि नखे कापणे निषिद्ध मानले जाते.
एकादशी व्रतानंतर द्वादशी तिथीला ब्राह्मण आणि गरिबांना भोजन करावे.
एकादशीच्या व्रतात रागावर नियंत्रण ठेवावे आणि बोलतांना शब्द जपून वापरावे.
या व्रतात दशमी तिथीपासून मांस आणि मद्यासह सर्व तामसिक पदार्थांचे सेवन करणे निषिद्ध मानले जाते.
एकादशीच्या दिवशी घरात झाडू नये कारण यामुळे मुंग्यांसह सर्व सूक्ष्म जीवांचा मृत्यू होतो, असे सांगितले जाते.
उत्पत्ति एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि देवी एकादशीची पूजा करा.
विष्णूच्या पूजेदरम्यान भोगात तुळशीच्या पानांचा अवश्य समावेश करावा. असे मानले जाते की, त्याशिवाय विष्णू नैवेद्य स्विकारत नाही.
पूजेदरम्यान विष्णूच्या ॐ नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करावा. विष्णू सहस्रनामाचे पठण करा.
या उपवासात केळी, द्राक्षे, आंबा आणि बदाम, पिस्ता अशा फळांचे सेवन करता येते.
मंदिरात जाऊन भगवंताचे दर्शन करा आणि अन्न, पैसा इत्यादी दान करा. गरीब आणि गरजूंना दान द्या.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. ही माहिती केवळ धार्मिक श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)