Utpanna Ekadashi Daan: हिंदू धर्मात एकादशी व्रत भगवान विष्णूला समर्पित आहे. कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाला उत्पत्ती एकादशीचे व्रत केले जाते. यावर्षी उत्पत्ती एकादशी मंगळवार, २६ नोव्हेंबर २०२४ रोजी आहे. धार्मिक मान्यतेनुसार एकादशीच्या दिवशी काही वस्तूंचे दान केल्याने जीवनात आर्थिक सुख-समृद्धी येते.
ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार उत्पत्ती एकादशी नोव्हेंबर महिन्यात असते. या महिन्यात थंडीला सुरुवात होते. अशा तऱ्हेने उत्पत्ती एकादशीच्या दिवशी गरजू व्यक्तीला उबदार वस्त्रदान करावे. असे केल्याने पुण्यप्राप्ती होते आणि घरात आशीर्वाद प्राप्त होतो, असे मानले जाते.
उत्पत्ती एकादशीच्या दिवशी गोसेवेसाठी किंवा गोसेवा करण्यासाठी धनदान करणे अत्यंत शुभ मानले जाते. असे केल्याने भगवान श्रीकृष्ण प्रसन्न होतात, असे मानले जाते.
उत्पत्ती एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळण्यासाठी ७ प्रकारचे धान्य दान करावे. ही देणगी एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा मंदिराला द्यावी. असे मानले जाते की उत्पत्ती एकादशीच्या दिवशी अन्नधान्यदान केल्याने जीवनात आर्थिक समृद्धी येते.
उत्पत्ती एकादशीच्या दिवशी गुळाचे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. असे केल्याने आर्थिक प्रगतीचा मार्ग मोकळा होतो, असे मानले जाते. कार्यात यश मिळते.
सर्व व्रतांमध्ये एकादशीच्या व्रताचे विशेष असे महत्त्व आहे. हे व्रत केल्याने वर्तमानातली पापे नष्ट तर होतातच, परंतु मागील जन्माची पापे देखील नष्ट होतात असे मानले गेले आहे. या बरोबरच आपल्या अनेक पिढ्यांमधील पितरांना मोक्ष प्राप्त होतो असेही म्हटलेले आहे. एकादशीचा उपवास सुरू करायचा असल्यास याच उत्पत्ती एकादशीपासूनच उपवासाला सुरूवात केली जाते.
उत्पत्ती एकादशीच्या दिवशी देवीचा जन्म झाला असे म्हटलेले आहे. म्हणूनच या एकादशीला उत्पत्ती एकादशी असे म्हटले गेले आहे.
सत्ययुगातील नदीजंग नावाच्या राक्षसाला मूर नावाचा मुलगा होता. त्याने देवांना जेरीस आणले होते. देवांना त्याच्यापासून वाचवण्यासाठी भगवान विष्णू याने मूर याच्याशी युद्ध केले. हे युद्ध १० हजार वर्षे चालले. भगवान विष्णू हे युद्ध करत असताना थकले. त्यानंतर ते बद्रिकाश्रम येथे जाऊन विश्रांती घेऊ लागले. राक्षर मूर त्यांचा पाठलाग करत तेथे पाहोचला. तेव्हा मूर भगवान विष्णूंवर हल्ला करणार इतक्यात विष्णूंच्या शरिरातून देवी जन्माला आली. तिने हल्ला करणाऱ्या मूर राक्षसाचा वध केला.
भगवान विष्णूने सांगितले की, तुझा जन्म माझ्या आवडत्या एकादशी तिथीला झाला आहे, तेव्हा आजपासून तुझे नाव उत्पत्ती एकादशी असे होईल. देवीमुळे राक्षसाचे जन्मोजन्मीचे पाप नष्ट होऊन त्याला मोक्ष मिळाला. म्हणून उत्पत्ती एकादशी ही पापक्षालन करणारी म्हणून आळखली जाऊ लागली.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. त्यांचा अवलंब करण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.