Ganeshotsav 2023 Kokan Mumbai : यंदाचा गणेशोत्सव कुटुंबियांसह साजरा करण्यासाठी असंख्य लोकांनी आपल्या घराची वाट धरली आहे. मुंबईतील चाकरमान्यांनी रेल्वे तसेच एसटी बस पकडून कोकणात जाण्याची तयारी सुरू केली आहे. त्यातच आता मुंबईहून कोकणात जाणाऱ्या ४४ एसटी बसची बुकिंग फुल्ल झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर आता चाकरमान्यांसाठी आणखी ३०० बसेस वाढण्यात आल्याचं महामंडळाकडून सांगण्यात आलं आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली, मुंबई, वसई विरार, मीरा भाईंदर, उल्हासनगर आणि नवी मुंबईसह अनेक बस स्थानकाहून कोकणात जाण्यासाठी विशेष एसटी बसची व्यवस्था करण्यात आली आहे.
दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात मुंबईतील चाकरमानी सुट्टी टाकत गणेशोत्सव कुटुंबियासोबत साजरा करत असतात. यावर्षी देखील चाकरमान्यांनी कोकणात जाण्यासाठी रेल्वे तसेच एसटी बसची बुकिंग करण्यास सुरुवात केली आहे. पुणे किंवा मुंबईत नोकरी करत असलेला कोकणवासी आवराआवर करत कोकणात जाण्यासाठी निघाला आहे. एसटी महामंडळासह राजकीय पक्षांकडून एसटीच्या ग्रुप बुकिंगसाठी तयारी करण्यात येत असल्याची माहिती आहे. चाकरमान्यांनी कोकणात जाण्यासाठी एसटीचे आगाऊ बुकिंग करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत ४४ एसटी बसेसची बुकिंग फुल्ल झाली असून आणखी काही बसेसची बुकिंग सुरू असल्याची माहिती एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
ऐनवेळी आवश्यकता पडल्यास आणखी ३०० एसटी बसेसचं नियोजन करण्यात आल्याचंही सांगण्यात आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून कोकणातील गणेशभक्तांची नोंदणी सुरू करण्यात आली आहे. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर शिवसेनेकडून काही बसेसची बुकिंग करण्यात येणार असल्याची माहिती आहे. परिणामी दहा सप्टेंबरनंतर एकाचवेळी अनेक बसगाड्यांची बुकिंग केली जाण्याची शक्यता आहे. राजकीय पक्षांकडून कोकणात जाण्यासाठी मोफत एसटी सेवा देण्यात येत असते. परंतु तरीदेखील अनेकांनी त्यापूर्वीच बुकिंग करण्यास सुरुवात केली आहे.
संबंधित बातम्या