Tirupati Balaji Temple : मुंबईजवळ १० एकर जागेवर उभं राहतंय भव्य प्रति तिरुपती बालाजी मंदिर! पायाभरणी झाली-tirupati balaji temple foundation in mumbai maharashtra government allots 10 acres of land to build ,धर्म बातम्या
मराठी बातम्या  /  धर्म  /  Tirupati Balaji Temple : मुंबईजवळ १० एकर जागेवर उभं राहतंय भव्य प्रति तिरुपती बालाजी मंदिर! पायाभरणी झाली

Tirupati Balaji Temple : मुंबईजवळ १० एकर जागेवर उभं राहतंय भव्य प्रति तिरुपती बालाजी मंदिर! पायाभरणी झाली

Sep 05, 2024 01:48 PM IST

Tirupati Balaji Temple Mumbai : महाराष्ट्रातील भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईत अनेक प्रसिद्ध मंदिरे आहेत, दरम्यान आता तिरुपती बालाजी मंदिराचा देखील यात समावेश होत आहे, मंदिराची पायाभरणी झाली.

मुंबईजवळ १० एकर जागेवर उभं राहतंय भव्य प्रति तिरुपती बालाजी मंदिर!
मुंबईजवळ १० एकर जागेवर उभं राहतंय भव्य प्रति तिरुपती बालाजी मंदिर!

नवी मुंबईजवळ उलवे येथे १० एकर जागेवर उभारण्यात येत असलेल्या प्रति तिरुपती बालाजी मंदिराचा पायाभरणी समारंभ नुकताच पार पडला. रेमण्ड उद्योगसमूहाचे अध्यक्ष गौतम सिंघानिया यांच्या हस्ते पायाभरणी कार्यक्रम पार पडला असून प्रत्यक्ष मंदिर उभारणीच्या कामाला सुरूवात झाली आहे. या प्रसंगी शिवसेना -ठाकरे गटाचे आमदार, तिरुमला तिरुपती देवस्थानच्या विश्वस्त मंडळाचे सदस्य मिलिंद नार्वेकर आणि तिरुमला तिरुपती देवस्थानमचे अधिकारी उपस्थित होते. या मंदिराच्या जागेचे भूमिपूजन गेल्यावर्षी करण्यात आले होते. या मंदिराच्या उभारणीसाठी राज्य सरकारने १० एकर जागा दिल्यानंतर रेमण्ड उद्योगसमूहाने मंदिर उभारणीसाठी १०० कोटी रुपये देणगी देणार असल्याचे जाहीर केले होते.

यावेळी रेमण्ड उद्योगसमूहाचे अध्यक्ष गौतम सिंघानिया म्हणाले, ‘नवी मुंबईतील श्री भगवान व्यंकटेश्वर मंदिराची पायाभरणी करणे ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. हा मंदिर प्रकल्प या भागातील भाविकांसाठी सांस्कृतिक आणि आध्यात्मिक दृष्ट्‍या आत्यंतिक महत्त्वाचा आहे. हे मंदिर म्हणजे भारताच्या समृद्ध धार्मिक वारशाचे जतन आणि संगोपन करण्याच्या आमच्या बांधिलकीचे प्रतीक आहे. मंदिराच्या कामाची पूर्तता करायला आम्ही पूर्ण प्राधान्य देणार असून नजीकच्या भविष्यात ते पूजा, आराधना करण्यासाठी आणि समाजाने एकत्र येण्यासाठीचे आदर्श केंद्र बनेल हे आम्ही सुनिश्चित करू.’ मुंबई आणि महाराष्ट्रातील इतर भागातील जे भाविक काही कारणास्तव आंध्र प्रदेशातील तिरुपती मंदिराला भेट देऊ शकत नाहीत अशांसाठी उलवे, नवी मुंबई येथे भगवान व्यंकटेश्वर बालाजीचे प्रति मंदिर उभारण्यात येत आहे. शिवाय उलवे येथील हे मंदिराचे ठिकाण हे आगामी आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ असल्याने बाहेरहून येणाऱ्या भाविकांसाठी व्यवहार्य स्थान होणार आहे. या कार्यक्रमाला खास तिरुपतीहून तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) चे कार्यकारी अधिकारी, आयएएस जे. श्यामला राव आणि TTD चे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी, आयआरएस च व्यंकय्या चौधरी हे देखील उपस्थित होते.

राज्य सरकारकडून मंदिरासाठी १० एकर जागा

नवी मुंबईत उलवे येथील सेक्टर १२ मध्ये प्रति तिरुपती बालाजी मंदिर उभारणीसाठी राज्य सरकारने सिडकोच्या मालकीची १० एकर जागा एप्रिल २०२२ मध्ये दिली होती. एमटीएचएलद्वारे या जागेचा कास्टिंग यार्ड म्हणून उपयोग केला जात होता. तिरुपतीच्या बालाजी मंदिर ट्रस्टतर्फे आंध्र प्रदेश राज्याबाहेर उभारण्यात येत असलेलं हे सहावं प्रति मंदिर आहे. यापूर्वी हैदराबाद चेन्नई कन्याकुमारी दिल्ली आणि भुवनेश्वर येथे प्रति बालाजीचे मंदिर उभारण्यात आले आहे.