Navgrah Temple Significance In Marathi : आज मंगळवार १४ जानेवारी २०२५ रोजी, मकर संक्रांतीचा सण देशभरात श्रद्धेने आणि उत्साहात साजरा केला जात आहे. मकर संक्रांती सणला विविध मंदिरात भाविकांची गर्दी असते, इंग्रजी कॅलेंडरनुसार, मकर संक्रांतीचा हा सण नवीन वर्षातील पहिला सण मानला जातो. त्याचप्रमाणे ज्योतिषशास्त्रातही मकर संक्रांतीचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी सूर्यदेव उत्तरायण होतात.
या विशेष प्रसंगी, सूर्यदेवासह नवग्रहांचे आशीर्वाद मिळावेत, यासाठी राज्यभरातून भाविक मध्य प्रदेशातील खरगोन येथील देशातील एकमेव सूर्य प्रधान नवग्रह मंदिरात दर्शन आणि पूजेसाठी येतात. असे मानले जाते की, मकर संक्रांतीच्या दिवशी येथे सूर्याचे दर्शन घेतल्यास वर्षभर नवग्रहाचे आशीर्वाद मिळतात. त्यामुळे या मंदिरात मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळपासून भाविकांची मोठी गर्दी होते. या दिवशी येथे नवग्रह जत्रेचेही आयोजन केले जाते.
खरगोनमधील कुंदा नदीच्या काठावर वसलेले या श्री नवग्रह मंदिरातच सूर्याचे पहिले किरण भगवान सूर्यनारायणावर पडतात, अशी प्राचीन मान्यता आहे. त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी श्री नवग्रह मंदिरात दर्शनाला विशेष महत्त्व आहे.
मकर संक्रांती हा सूर्याचे स्वागत करण्याचा सण आहे. नवग्रह मंदिरात सूर्याचे वर्चस्व आहे. येथे गर्भगृहात मध्यभागी सूर्याची मूर्ती विराजमान आहे, मूर्तीभोवती इतर ग्रह आहेत. असे मानले जाते की मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याची उपासना केल्यास नवग्रहाची कृपा होते आणि वर्षभर ग्रहशांतीचे फळ मिळते. मंदिराची रचना प्राचीन ज्योतिषशास्त्राच्या तत्त्वांनुसार करण्यात आली आहे.
मंदिरात प्रवेश करताना सात पायऱ्या आहेत, जे आठवड्यातील सात दिवसांचे प्रतीक आहे. यानंतर माता सरस्वती, श्री राम आणि पंचमुखी महादेव ब्रह्मा विष्णूच्या रूपात दिसतात. नंतर गर्भगृहात जाण्यासाठी १२ पायऱ्या उतराव्या लागतात, जे १२ महिन्यांचे प्रतीक आहे. गर्भगृहात नवग्रह दिसतो. यानंतर, १२ पायऱ्यांनी दुसरा मार्ग वर चढतो, जे १२ राशींचे प्रतीक आहे. अशाप्रकारे आपले जीवन आठवड्याचे सात दिवस, १२ महिने, १२ राशी आणि नवग्रहाच्या प्रभावाखाली चालते आणि त्याच आधारावर मंदिराची रचना करण्यात आली आहे.
मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान सूर्य दक्षिणायनातून उत्तरायणात प्रवेश करतात. या दिवशी सूर्यदेवाची आणि नवग्रहाची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात, असे मानले जाते. या दिवशी भगवान सूर्यनारायणाची कथा सांगण्याचेही विशेष महत्त्व मानले जाते. खरगोनच्या नवग्रह मंदिरात मकर संक्रांतीच्या दिवशी पहाटे ४ वाजल्यापासूनच भगवान सूर्यनारायणाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागतात.
संबंधित बातम्या