Surya Grahan Date and Time In India October 2024 : अमावस्येला सूर्य, पृथ्वी आणि त्यांच्या मध्ये चंद्र एका सरळ रेषेत येतात, तेव्हा चंद्रामागे सूर्य झाकला जातो. म्हणजे सूर्याला ग्रहण लागतं. जाणून घ्या सूर्यग्रहण कधी आहे, कुठे दिसेल, कसे असेल, कोणत्या वेळी होईल.
या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण बुधवार १८ सप्टेंबर रोजी होते. आता काही दिवसांवरच सूर्यग्रहणही होणार आहे. यावेळी पितृ पक्षातच दोन ग्रहण होत आहेत, त्यापैकी एक चंद्रग्रहण आहे आणि वर्षातील दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण २ ऑक्टोबर रोजी सर्वपितृ अमावस्येला होणार आहे. हे ग्रहण एक कंकणाकृती सूर्यग्रहण असेल, जे रिंग ऑफ फायरचे दृश्य दर्शवेल.
भारतात हे सूर्यग्रहण दिसणार नाही, त्यामुळे या ग्रहणाचा सुतक काळही मानला जाणार नाही. सामान्यतः सूर्यग्रहणाचा सुतक कालावधी १२ तास आधी सुरू होतो आणि त्यात अनेक नियम पाळले जातात. मात्र या ग्रहणाला धार्मिक दृष्टिकोनातून काहीही महत्त्व नाही. हा दिवस सर्व पितृ अमावस्या आहे, ज्यामध्ये पूर्वजांना निरोप दिला जाईल. यानंतर दुसऱ्या दिवसापासून नवरात्रीची पूजाही वेळेनुसार केली जाईल.
भारतीय वेळेनुसार, ग्रहण २ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजून १३ मिनिटांनी सुरू होईल आणि ३ ऑक्टोबर रोजी पहाटे ३ वाजून १७ मिनिटापर्यंत राहील. जेव्हा हे ग्रहण होईल तेव्हा भारतात रात्र होईल आणि सूर्यास्त झालेला असेल. त्यामुळे या ग्रहणाचा भारतात कोणताही परिणाम होणार नाही. या ग्रहणाचा सुतक काळही वैध राहणार नाही.
पृथ्वीच्या ज्या भागांवर चंद्राची सावली पडते अशाच भागांवरून सूर्यग्रहण दिसते. हे कंकणाकृती सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. भारताबाहेर अर्जेंटिना, पॅसिफिक, आर्क्टिक, दक्षिण अमेरिका, पेरू आणि फिजीमध्ये हे ग्रहण दिसणार आहे.
कंकणाकृती सूर्यग्रहण दरम्यान, चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर जास्त असताना चंद्र पृथ्वी आणि सूर्य यांमध्ये एका रेषेत आल्यास चंद्राचे कोनीय माप हे सूर्यापेक्षा लहान झाल्याने सूर्य पूर्णपणे झाकला जात नाही आणि चंद्र त्याच्या कडांवर गोलाकार रिंगसारखा आकार सोडतो. जो सूर्यप्रकाशामुळे चमकतो. याला रिंग ऑफ फायरचा प्रभाव म्हणतात.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)