सध्याच्या धावपळीच्या युगात नोकरी हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. स्वतःचा कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी आणि लाईफस्टाईल सुधारण्यासाठी प्रचंड पैशांची गरज भासते. अशावेळी शहरामध्ये राहून नोकरीतून या गरजा लोक पूर्ण करत असतात. नोकरी करणे हे प्रत्येक व्यक्तीसाठी तितकेच आनंददायक नसते. यामध्ये काही लोकांची वेगाने प्रगती होते तर काहींना केवळ मनस्ताप आणि बॉसची बोलणीच वाट्याला येतात.
काही लोकांना काहीही न करता आणि विशेष असे कष्ट न घेता वरिष्ठांची मर्जी प्राप्त होते. तसेच वेगाने बढती आणि पदप्राप्ती मिळते. मात्र काही लोक असे असतात ज्यांना अशा लोकांच्या तुलनेत दुप्पट कष्ट करुन आणि क्षमतेपेक्षा जास्त काम करुनसुद्धा प्रगती दिसून येत नाही. याउलट सतत अडचणी येऊन बॉसची बोलणी ऐकावी लागतात. तर अशावेळी तुमची कोणतीही चूक नसून यामागेसुद्धा एक महत्वाचे कारण असते.
जोतिषशास्त्रानुसार जर तुम्हालाही ऑफिसमध्ये सतत विनाकारण वरिष्ठांची नाराजी मिळत असेल. तर यामागे ग्रह-नक्षत्रांचासुद्धा परिणाम असू शकतो. कारण ग्रह-नक्षत्रांच्या हालचालींमुळे काही ग्रह काही राशींच्या लोकांसाठी नकारात्मक परिणाम देत असतात. त्यामुळे या लोकांना वैवाहिक, आर्थिक आणि करिअरमध्ये सतत अडचणी आणि निराशा सहन कराव्या लागत असतात.
जोतिष शास्त्रानुसार सूर्य ग्रहाला अतिशय शक्तिशाली ग्रह समजले जाते. ज्या राशींमध्ये सूर्य शुभ स्थान प्रस्थपित करतो त्या राशींना अत्यंत लाभदायक परिणाम पाहायला मिळतात. मात्र ज्या राशींमध्ये सूर्य अतिशय कमजोर असतो त्या राशींना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. शास्त्रानुसार ऑफिसमधील प्रगती आणि अधोगतीचा सूर्य ग्रहाशी संबंध जोडला जातो. आणि हेच कारण आहे की तुम्हाला ऑफिसमध्ये सतत बॉसकडून बोलणी खावी लागतात. तुमच्या कुंडलीत सूर्य कमजोर असल्याने तुम्हाला हा त्रास होत असतो.
जोतिष शास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य कमजोर असेल तर त्याच्यामध्ये उद्धटपणा आणि चिडचिडपणाची वृत्ती दिसून येते. त्यामुळे हे लोक ऑफिसमध्ये वरिष्ठांचा आदर करण्यात कमी पडतात. वरिष्ठांना पुरेसा मानसन्मान न दिल्याने यांच्या प्रगतीत अडथळे यायला सुरु होतात. तसेच सूर्य कमजोर असल्याने या लोकांमध्ये नेतृत्वाची कमतरता होते. आणि त्यामुळे हे लोक कोणत्याही गोष्टीत ठामपणे बाजू मांडू शकत नाहीत. योग्यरीत्या लोकांचे नेतृत्व करण्यात कमी पडतात. त्यामुळे अशा लोकांना सतत बॉसची बोलणी ऐकावी लागतात.
जोतिष शास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये सूर्य ग्रहाला मजबूत करण्यासाठी विशेष उपाय सांगण्यात आला आहे. यानुसार सकाळी लवकर उठून. स्नान करून घ्यावे. त्यांनंतर एका तांब्याच्या लोट्यात जल घेऊन त्यामध्ये लाल चंदन, लाल पुष्प, अर्धा चमचा साखर आणि रोळी टाकून ते जल सूर्यदेवाला अर्पण करावे. मात्र सूर्यदेवाला जल अर्पण करताना त्या पाण्याचे थेंब आपल्या पायावर पडू नयेत याची काळजी घ्यावी. या उपायाने कुंडलीत सूर्य मजबूत होऊन तुमच्या स्वभावात प्रभावी बदल दिसून येईल. आणि वरिष्ठांसोबत संबंध सुधारुन प्रगतीचा मार्ग मोकळा होईल.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती धार्मिक मान्यतांवर आधारित आहे. ती पूर्णपणे सत्य आणि अचूक आहे, असा हिंदुस्तान टाइम्स मराठीचा दावा नाही. त्यामुळं अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ञाचा सल्ला जरूर घ्या.)