खोजा पंथी मुस्लिमांचे धर्मगुरू प्रिन्स आगा खान यांचं ८८ व्या वर्षी पॅरिसमध्ये निधन. खोजा पंथ काय आहे?
मराठी बातम्या  /  धर्म  /  खोजा पंथी मुस्लिमांचे धर्मगुरू प्रिन्स आगा खान यांचं ८८ व्या वर्षी पॅरिसमध्ये निधन. खोजा पंथ काय आहे?

खोजा पंथी मुस्लिमांचे धर्मगुरू प्रिन्स आगा खान यांचं ८८ व्या वर्षी पॅरिसमध्ये निधन. खोजा पंथ काय आहे?

Haaris Shaikh HT Marathi
Feb 05, 2025 05:14 PM IST

खोजा मुस्लिमांचे धर्मगुरू प्रिन्स आगा खान यांचे फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. प्रिन्स आगा खान यांचे सर्वाधिक अनुयायी मुंबई आणि पुण्यात राहतात.

खोजा पंथी मुस्लिमांचे धर्मगुरू प्रिन्स आगा खान
खोजा पंथी मुस्लिमांचे धर्मगुरू प्रिन्स आगा खान (AFP)

खोजा मुस्लिमांचे धर्मगुरू प्रिन्स आगा खान यांचे फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. हार्वर्ड विद्यापीठात शिक्षण घेतलेले आगा खान वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी जगभरातील इस्माईली मुस्लिमांचे आध्यात्मिक नेते बनले होते. आगा खान यांनी जगातील अनेक विकसनशील देशांमध्ये गरिबांसाठी घरे, रुग्णालये आणि शाळांच्या उभारणीसाठी मोठ्या प्रमाणावर निधी दिला होता. आगा खान यांच्या पश्चात तीन मुलगे आणि एक मुलगी असा परिवार आहे. लवकरच त्यांच्या उत्तराधिकाऱ्याची घोषणा केली जाईल, असं आगा खान ट्रस्टतर्फे सांगण्यात आलं आहे. त्यांनी सांगितले. 

प्रिंस आगा खान हे इस्लामचे संस्थापक पैगंबर मुहम्मद यांचे थेट वंशज मानले जातात. आगा खान हे मोठे उद्योजक होते. गेल्या काही दशकांत त्यांनी आध्यात्मिक आणि सांसारिक गोष्टींचा समतोल साधत परोपकारी बनले होते.

आगा खान यांचे आजोबा आगा खान (तिसरे) यांनी वृद्धापकाळात १९ ऑक्टोबर १९५७ रोजी टांझानियातील दार ए सलाम येथे प्रिन्स आगा खान यांना जगभरातील इस्माईली खोजा मुस्लिम समुदायाचे धर्मगुरू म्हणून जाहीर केले होते. त्याच ठिकाणी खोजा मुस्लिम अनुयायांनी प्रिन्स आगा खान यांची हिऱ्यांमध्ये तुला केली होती. खोजा मुस्लिमांच्या १,३०० वर्षे जुन्या घराण्याचा वारसा ते चालवत होते. जुलै १९५७ मध्ये ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ यांनी त्यांना ‘महामहिम’ (His Highness) ही पदवी बहाल केली होती.

इस्लामी संस्कृती आणि मूल्यांचे कट्टर पुरस्कर्ते असलेले प्रिन्स आगा खान हे जगभरातला मुस्लिम समाज आणि पाश्चिमात्य देश यांच्यातील सेतू-निर्माते म्हणून ओळखले जातात. राजकारणापासून दूर राहून त्यांनी ही भूमिका स्वीकारली होती. ‘आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्क’ या संस्थेच्या माध्यमातून जगभरातील गरीब देशांमध्ये आरोग्य सेवा, गृहनिर्माण, शिक्षण आणि ग्रामीण आर्थिक विकासावर त्यांनी लक्ष केंद्रित केले होते.

बांगलादेश, ताजिकिस्तान आणि अफगाणिस्तान या देशांमध्ये त्यांच्या नावाची रुग्णालये स्थापन केली गेली आहेत. शिवाय स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी त्यांनी कोट्यवधी डॉलर्सची गुंतवणूक केली होती.

आर्किटेक्चर आणि डिझाइन हे त्यांच्या आवडीचे क्षेत्र होते. यावर ते बारकाईने लक्ष ठेवून असत. या क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी त्यांनी एका प्रतिष्ठेच्या स्थापत्य पुरस्काराची स्थापना केली होती. एमआयटी आणि हार्वर्ड विद्यापीठात त्यांनी इस्लामिक आर्किटेक्चरसाठी अभ्यासक्रम सुरू केला होता. जगभरातील ऐतिहासिक इस्लामी वास्तुंच्या जीर्णोद्धारासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर निधी दिला होता.

आगाखानच्या आर्थिक साम्राज्याची व्याप्ती मोजणे कठीण आहे. काही अहवालांमध्ये त्यांची वैयक्तिक संपत्ती अब्जावधींच्या घरात असल्याचा अंदाज

खोजा इस्माईली संप्रदायाचे सर्वाधिक अनुयायी हे भारतात राहतात. शिवाय पूर्व आफ्रिका, मध्य आणि दक्षिण आशिया आणि मध्य पूर्वेतील अनेक देशांमध्येही हा समुदाय विस्तारलेला आहे. जगातला प्रत्येक खोजा मुस्लिम नागरिक आपल्या उत्पन्नाचा १०% हिस्सा प्रिंस आगा खान यांना धार्मिक इमाम म्हणून देत असतो. 

Whats_app_banner