Somvati Amavasya 2024 September : हिंदू धर्मात अमावस्या तिथीला विशेष महत्त्व आहे. श्रावण महिन्यात सोमवारी येणाऱ्या अमावस्यामुळे सोमवती अमावस्येचा योगायोग निर्माण होत आहे. तसेच हा श्रावण महिन्यातील शेवटचा पाचवा श्रावण सोमवार आहे. या दिवसाला दर्श अमावस्या किंवा पिठोरी अमावस्या असेही म्हणतात. या दिवशी महाराष्ट्रात पोळा हा सण साजरा केला जातो. पोळा सणाला बैलांची पूजा करण्याचे विशेष महत्व आहे.
सोमवती अमावस्येच्या दिवशी लोक ब्रह्म मुहूर्तावर स्नान करतात, दान करतात आणि तर्पण करतात. असे केल्याने शुभ फळ मिळते असे मानले जाते. श्रावण महिन्यातील सोमवती अमावस्येला स्नान आणि दान करण्याचा शुभ मुहूर्त जाणून घ्या-
श्रावण कृष्ण अमावस्या २ सप्टेंबर रोजी सकाळी ५ वाजून २१ मिनिटांनी वाजता सुरू होईल आणि ३ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजून २४ मिनिटांनी समाप्त होईल. उदया तिथीनुसार सोमवार २ सप्टेंबर २०२४ रोजी सोमवती अमावस्या साजरी केली जाईल.
सोमवती अमावस्येच्या दिवशी ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ३८ मिनिटे ते ५ वाजून २४ मिनिटापर्यंत असेल. पूजन मुहूर्त सकाळी ६ वाजून ९ मिनिटे ते ७ वाजून ४४ मिनिटापर्यंत असेल.
सोमवती अमावस्येच्या दिवशी पवित्र नदीत स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे. या दिवशी एखाद्याने आपल्या क्षमतेनुसार गरीब किंवा गरजूंना दान करावे. अमावस्येच्या दिवशी पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने जीवनात आनंद मिळतो. अमावस्येच्या दिवशी भगवान शिवाच्या महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. हा शेवटचा श्रावण सोमवार असल्यामुळे या दिवशी यथायोग्य भगवान शंकराचे पूजन करावे आणि शिवमूठ सातू वाहावी. तसेच शिवाचा मनोभावे अभिषेक केल्याने विशेष लाभ होईल. असे मानले जाते की, यामुळे आर्थिक चणचण दूर होते आणि पैसा येण्याचा मार्ग मोकळा होतो.
सोमवती अमावस्येच्या दिवशी सकाळी ७ वाजून ३४ मिनिटे ते ९ वाजून ९ मिनिटापर्यंत राहुकाळ राहील. यानंतर सकाळी १० वाजून ४४ मिनिटे ते १२ वाजून २० मिनिटापर्यंत यमगंड राहील. ज्योतिष शास्त्रात राहुकाळ आणि यमगंड हे अशुभ मानले जातात. अशा परिस्थितीत या काळात कोणतेही शुभ कार्य किंवा दान-धर्म करण्यास मनाई आहे.