Surya Grahan Impact on Rashi : पितृपक्षातील शेवटच्या दिवसावर सूर्यग्रहणाचं सावट असणार आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार नेहमी अमावस्या आणि पौर्णिमेच्या तिथीला ग्रहणे होतात. अमावस्या तिथीला सूर्यग्रहण आणि पौर्णिमेला चंद्रग्रहण होतं.
यंदा २ ऑक्टोबरला सूर्यग्रहण होणार आहे. हा दिवस सर्वपितृ अमावस्येचा आहे. पितृपक्षाचा हा शेवटचा दिवस आहे. या दिवशी सर्व पूर्वज पृथ्वीचा निरोप घेतात. ज्योतिषशास्त्रात सूर्यग्रहणाची घटना अशुभ मानली जाते. सूर्यग्रहणाचा परिणाम देश आणि जगासह मानवी जीवनावर होत असतो.
ज्योतिषी नरेंद्र उपाध्याय यांनी आमची सहकारी न्यूज वेबसाइट 'लाइव्ह हिंदुस्तान'शी बोलताना सूर्यग्रहणाचे राशीवर होऊ शकणारे परिणाम व त्या पार्श्वभूमीवर घ्यावयाच्या खबरदारीची माहिती दिली. त्यानुसार, येत्या २ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सूर्यग्रहणाचा सर्वाधिक परिणाम कन्या आणि मीन राशीच्या लोकांवर होणार आहे.
हिंदू धर्मात ग्रहण हा शब्दच नकारात्मक मानला जातो. सूर्यग्रहण ही अशुभ घटना आहे, त्यामुळं सूर्यग्रहण कोणासाठीही शुभ किंवा लाभदायक ठरणार नाही. या काळात प्रत्येक व्यक्तीनं किंवा जनतेनं खबरदारी घ्यावी. सूर्यग्रहणाच्या काळात महत्त्वाचे निर्णय पुढं ढकलावेत. भावनिक होऊन कोणताही निर्णय घेणं टाळावं. या काळात आर्थिकदृष्ट्या सावध राहणं फायद्याचं ठरेल.
नासाच्या वेबसाईटनुसार, हे कंकणाकृती सूर्यग्रहण असेल. कंकणाकृती सूर्यग्रहण दक्षिण अमेरिकेत तर अंशत: ग्रहण दक्षिण अमेरिका, अंटार्क्टिका, पॅसिफिक महासागर, अटलांटिक महासागर, उत्तर अमेरिकेत दिसेल.
येत्या २ ऑक्टोबरला होणारे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. ज्या अर्थी सूर्यग्रहण दिसणार नाही, त्याअर्थी देशात सूतक काळ लागू होणार नाही.