Siyaram Baba Passed Away: मध्यप्रदेशातील निमाड येथील संत सियाराम बाबा यांचे आज निधन झाले. आज बुधवारी मोक्षदा एकादशीला सकाळी ०६ वाजून १० मिनिटांनी बाबांनी देह सोडला. ते काही दिवसांपासून आजारी होते आणि आश्रमातच त्यांच्यावर उपचार सुरू होते. रात्री त्यांची प्रकृती खूपच नाजूक होत होती. तसेच त्यांनी काहीही खाल्ले देखील नव्हते. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच खरगोनमधील भाट्यान येथील आश्रमात भाविकांची गर्दी झाली होती. त्यांची अंत्ययात्रा आज दुपारी तीन वाजता निघेल असे वृत्त आहे .
गेल्या तीन दिवसांपासून आश्रमात जमलेले भाविक त्यांच्या प्रकृतीसाठी भजन गात होते. मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या सूचनेनंतर डॉक्टरांचे पथक त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून होते. सीएम यादव आज संध्याकाळी बाबांना भेटणार होते, मात्र आता ते त्यांच्या अंतिम दर्शनासाठी येत आहेत. बाबांच्या अंत्यसंस्कारासाठी सेवकांनी चंदनाची व्यवस्था केली आहे.
बुधवारी संध्याकाळी आश्रमाजवळील नर्मदा नदीच्या काठावर सियाराम बाबा यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच आश्रमात भाविकांची मोठी गर्दी होऊ लागली आहे. बाबांना न्यूमोनियाचा त्रास होता, मात्र त्यांना रुग्णालयात राहण्याऐवजी आश्रमात राहून त्यांच्या भक्तांना भेटायचे होते. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला.
मध्यप्रदेशातील निमाड येथे बाबा सियाराम कोठून आले याची माहिती कोणाकडेही नाही. अंदाजे ६० ते ७० वर्षांपूर्वी बाबा या गावात आले आणि तेव्हा पासून ते तैली भट्याण या गावात आश्रम बांधून राहिले. बाबांनी आपली कुटी तयार केली आणि कुटीत हनुमानच्या मूर्तीचा प्रतिष्ठापना केली. तेथे ते सकाळ संध्याकाळ राम नामाचा जप करत असत. तसेच ते रामचरिमानसते देखील पठण करत असत.
बाबा सियाराम यांचा जन्म मुंबईत झाल्याचे सांगितले जाते. इयत्ता ७वी ते ८ वी पर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर ते एका गुजराती सावकाराकडे मुनीम म्हणून काम करू लागले. त्याच दरम्यान त्यांना एका संन्याशाचे दर्शन झाले. त्यानंतर त्यांच्या मनात वैराग्य उत्पन्न झाले. रामभक्तीचा भाव मनात जागा झाला आणि त्यानंतर ते थेट हिमालयात साधनेसाठी निघून गेले.
बाबांचे गुरू कोण याचीही माहिती कोणाकडे नाही. त्यांनी किती वर्षे हिमालयात साधना केली हे देखील कोणाला माहीत नाही.
बाबांच्या नावाची कहाणी मजेदार आहे. बाबांनी १२ वर्षे मौन धारण केले. १२ वर्षांनंतर जेव्हा त्यांनी तोंड उघडले तेव्हा त्यांच्या तोंडातून एक शब्द आला 'सियाराम'. यामुळे गावातील लोकांनी त्यांचे नाव सियाराम असे ठेवले.
बाबांनी १० वर्षे खडेश्वर तप केले होते. हे कठीण तप असते. यात तपस्वी झोपण्यापासून सर्वच कामे उभ्यानेच करतो. असे म्हणतात की बाबांचे खडेश्वर तप सुरू असताना नर्मदा नदीला पूर आला. पाणी बाबांच्या बेंबीपर्यंत चढले. मात्र बाबा जागचे हलले नाहीत. नंतर पूर ओसरला.
संबंधित बातम्या