रामनवमी ३० मार्च २०२३ रोजी साजरी केली जाणार आहे. भगवान श्रीराम यांचा हा जन्मदिवस. रामाच्या देवळात जाऊन उद्या भक्त श्रीरामाचं दर्शन घेतील. मात्र यंदा आलेली श्रीरामनवमी पाच शुभ योग घेऊन आली आहे. भगवान श्री रामांचा जन्म दुपारच्या सुमारास झाला असं सांगितलं जातं. त्यामुळे दुपारचे यंदाचे राम जन्माचे मुहूर्त कोणते असतील यावरही एक नजर टाकूया.
कोणत्या शुभ योगात रामजन्म होणार साजरा
मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीरामाचा जन्म यावेळी ५ अनोख्या शुभ योगात साजरा करण्यात येईल. गुरुवार, ३० मार्च रोजी रामनवमीचा सण साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी पुनर्वसु नक्षत्र रात्री १०:५९ पर्यंत राहील. गुरुवारी पुनर्वसु नक्षत्रामुळे सिद्धी योग आणि पुष्य नक्षत्रामुळे शुभ नावाचा योग तयार होईल. यासोबतच सर्वसिद्धी योग आणि रवि योग, अमृत सिद्धी योग देखील असतील. असे अनेक शुभ योग एकत्र आल्याने रामनवमी सणाचे महत्त्व वाढले आहे.
प्रभू श्रीरामांचा जन्म कधी झाला होता, यंदाचा मुहूर्त कोणता
प्रभू रामाचा जन्म दुपारी झाला होता असं सांगितलं गेलं आहे. म्हणूनच यावेळी जन्मोत्सव अभिजीत मुहूर्तात म्हणजेच सकाळी ११.१५ ते दुपारी ०१.४८ या वेळेत साजरा करणे योग्य ठरेल असं ज्योतिषांचं मत आहे. या शुभ प्रसंगी रामरक्षेचा पाठ करावा, रामरक्षा म्हटल्याने मनात आणि आचरणात चांगल्या गोष्टी येतात.
रामनवमी कधी सुरू होईल आणि कधी संपेल
चैत्र शुक्ल नवमी तिथी २९ मार्च रोजी रात्री ०९ वाजून ०५ मिनिटांनी सुरू होईल आणि ३० मार्च रोजी रात्री ११ वाजूून २८ मिनिटांनी समाप्त होईल.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)