Krishna Janmashtami 2024 Dwapar Yug Muhurat : वर्ष २०२४ ची कृष्ण जन्माष्टमी सोमवारी एका विशेष योग-संयोगात साजरी होणार आहे. ५२५१ वर्षांपूर्वी म्हणजेच द्वापर युगात जो दुर्मिळ योग तयार झाला होता तोच दुर्मिळ योग या दिवशी तयार होत आहे. या दिवशी रोहिणी नक्षत्रासोबत सूर्य सिंह राशीत, चंद्र वृषभ राशीत असून, श्रीकृष्ण जयंती योग तयार होत आहे. अशा दुर्मिळ संयोगाची निर्मिती अत्यंत शुभ मानली जाते. या योगात उपासना केल्याने अनेक पटींनी अधिक फल प्राप्त होईल.
असे मानले जाते की, जयंती योगामध्ये व्रत पाळल्यास शाश्वत पुण्य प्राप्त होते. रोहिणी नक्षत्र २६ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजून ५५ मिनिटांनी सुरू होईल आणि २७ रोजी मध्यरात्रीपर्यंत राहील. यासोबतच जन्माष्टमीच्या दिवशी चंद्र वृषभ राशीत असेल. असे मानले जाते की, जेव्हा भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला तेव्हा असाच योग तयार झाला होता. त्या वेळीही चंद्र वृषभ राशीत होता. यासोबतच यावेळी सोमवारी जन्माष्टमीचा सण आहे. हा सण जेव्हा सोमवार किंवा बुधवारी येतो तेव्हा हा एक अतिशय शुभ संयोग मानला जातो. तसेच हा श्रावण महिन्यातील चौथा श्रावण सोमवार आहे.
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी स्नान करून पूजा करून व्रताचा संकल्प करावा. भगवान श्रीकृष्णाची मूर्ती किंवा चित्र स्थापित करून किंवा बाळकृष्णाचा आकर्षक श्रृंगार करून पाळणा सजवावा. यानंतर विधीनुसार पूजा करावी. पूजेमध्ये अनुक्रमे देवकी, वासुदेव, बलदेव, नंद, यशोदा आणि लक्ष्मी यांची नावे घ्यावीत. भगवान श्रीकृष्णाला गंगाजल आणि कच्च्या दुधाने अभिषेक करा. बाळकृष्णाला स्वच्छ कपड्याने पुसून कोरे कपडे, बांगड्या, कानातले, मुकुट आणि फुलांच्या माळा घालाव्यात. मग त्यांना पाळणामध्ये झुलवावे. तसेच, तुपाचा दिवा लावून श्रीकृष्णाचा पाळणा म्हणावा, आरती करावी. लोणी, खडीसाखर आणि इतर बाळकृष्णाच्या आवडत्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण करा आणि क्षमाप्रार्थना करा.
सकाळी पूजेची शुभ वेळ - पहाटे ५ वाजून ५५ मिनिटे ते ७ वाजून ३६ मिनिटापर्यंत (यादरम्यान अमृत चौघडिया असेल).
दुपारी पूजेसाठी शुभ वेळ - दुपारी ३ वाजून ३५ मिनिटे ते सायं ७ वाजेपर्यंत.
रात्रीच्या पूजेसाठी शुभ मुहूर्त - मध्यरात्री १२ ते १२ वाजून ४५ मिनिटापर्यंत.
अभिजीत मुहूर्त - हा एक शुभ मुहूर्त मानला जातो आणि या काळात तुम्ही भगवान श्रीकृष्णाची पूजा देखील करू शकता, अभिजीत मुहूर्त दिवसभरात सकाळी ११:५६ ते दुपारी १२:४८ पर्यंत असेल.