श्रावण महिना भगवान शंकराच्या उपासनेसाठी समर्पित आहे. या संपूर्ण महिन्यात महादेवाला प्रसन्न करण्यासाठी भाविक विविध उपाय करतात. वास्तविक, श्रावण महिन्यात भगवान शिव माता पार्वतीसोबत पृथ्वीच्या दर्शनासाठी येतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे. श्रावण काळात भगवान शिवाच्या प्रसिद्ध मंदिरात विशेष प्रार्थना केली जाते.
याशिवाय श्रावणामध्ये शिवभक्त कावड यात्राही काढतात. भोलेनाथाची पूजा दर सोमवारी होत असली तरी श्रावणातील सोमवारला विशेष महत्त्व आहे. श्रावण सोमवारी उपवास करून शिवलिंगाची पूजा केली जाते.
यंदाच्या श्रावण महिन्यात ५ सोमवार आहेत, त्यापैकी दोन सोमवारचे उपवास भाविकांनी पूर्ण केले आहेत. परंतु श्रावणाच्या तिसऱ्या सोमवारचा उपवास १९ ऑगस्ट २०२४ रोजी केला जाणार आहे. या दिवशी रक्षाबंधनाचा सणही साजरा केला जाणार आहे.
त्यामुळे आता श्रावण सोमवारच्या संदर्भात लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे की या सोमवारी उपवास ठेवायचा की नाही. अशा स्थितीत आपण भक्तांच्या मनातील गोंधळ दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत.
यावर्षी १९ ऑगस्ट रोजी श्रावण सोमवार आणि रक्षाबंधन असा शुभ संयोग आहे. या दिवशी उपवास ठेवावा की नाही, याबाबत लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
ज्योतिषांच्या मते, जर तुम्ही श्रावण सोमवार व्रताचा संकल्प केला असेल, तर तुम्ही या महिन्यात येणाऱ्या प्रत्येक सोमवारी व्रत ठेवावे, तरच तुम्हाला पूर्ण फळ मिळेल. रक्षाबंधनाच्या दिवशी येणाऱ्या सोमवारी व्रत ठेवावे आणि विधीनुसार भगवान शंकाराची पूजा करावी.
इतर श्रावण सोमवारप्रमाणेच या सोमवारच्या उपवासातही नियमांचे पालन करावे. जर तुम्ही रक्षाबंधनाच्या दिवशी म्हणजेच श्रावण सोमवारी उपवास केला नाही तर तुम्हाला पूजेचा पूर्ण लाभ मिळणार नाही.