हिंदू धर्मामध्ये ३३ कोटी देवी-देवतांचा उल्लेख असून यामध्ये सर्वात जास्त व्रत, उपासना देवांचे देव महादेव यांची केली जाते. सध्या श्रावण महिना सुरू आहे आणि भाविक मनोभावे भगवान शिवाची उपासना करत आहे. काही भक्तांना भगवान शंकराचे दर्शन घेण्याची आणि एखाद्या खास मंदिराला भेट देण्याची आतुरता असते.
भारतात भगवान शिवाला समर्पित अनेक मंदिरे आहेत जिथे रंजक घटना घडतात. असेच एक मंदिर म्हणजे गुजरातचे श्रीस्तंभेश्वर महादेव मंदिर. या मंदिराची खास गोष्ट म्हणजे हे मंदिर दिवसातून दोनदा म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी अदृश्य होते. यामागे एक नैसर्गिक घटना आहे. चला जाणून घेऊया या मंदिराचा रंजक इतिहास आणि खास वैशिष्ट्य.
गुजरात राज्यातील बडोदापासून ८५ किलोमीटर अंतरावर स्थित जंबूसर तहसील क्षेत्रातील कावी-कंबोई गावातील या मंदिराला निसर्गाचा आशीर्वाद आहे. स्तंभेश्वर नावाचे हे महादेव मंदिर दिवसातून दोन वेळेस सकाळी आणि संध्याकाळी क्षणभरात डोळ्यांसमोरून अदृश्य होते आणि काही वेळानंतर पुन्हा त्याच जागेवर दिसते. श्रीस्तंभेश्वर महादेव मंदिर १५० वर्षे जुने आहे.
वास्तविक हे मंदिर अरबी समुद्र आणि खंभातच्या आखाताने वेढलेले आहे. जेव्हा समुद्रात भरती असते तेव्हा हे मंदिर पूर्णपणे समुद्रात बुडते. हे दिवसातून दोनदा घडते. पाण्याची पातळी खाली आल्यावर हे मंदिर पुन्हा दिसू लागते. श्रद्धेमुळे लोकांचा असा विश्वास आहे की समुद्र दिवसातून दोनदा शिवलिंगाला अभिषेक करतो. परंतू, असे समुद्राला आलेल्या (ज्वारभाटा) भरती, आहोटीमुळे होते. या काळामध्ये तुम्ही शिवलिंगाचे दर्शन घेऊ शकत नाहीत. कारण समुद्रात मोठमोठ्या लाटा निर्माण झाल्यानंतर हे शिवलिंग पूर्णपणे जलमय होते आणि मंदिरापर्यंत कोणीही जाऊ शकत नाही. ही प्रक्रिया प्राचीन काळापासून चालू आहे.
पौराणिक कथेनुसार, येथे उपस्थित असलेल्या शिवलिंगाची स्थापना महादेवाचा पुत्र भगवान कार्तिकेयाने केली होती. या शिवलिंगाची स्थापना करण्यामागील कारण म्हणजे भगवान कार्तिकेयाने तारकासुर या राक्षसाचा वध केला होता. तारकासुर हा शिवभक्त होता. यामुळे भगवान कार्तिकेयाला अपराधी वाटू लागले. म्हणून भगवान विष्णूने त्याला शिवलिंगाची स्थापना करून क्षमा मागण्याचा सल्ला दिला. त्यानंतर भगवान कार्तिकेयाने या शिवलिंगाची स्थापना केली.
श्रावण महिन्यात या मंदिरात शिवलिंगाच्या दर्शनासाठी लोकांची गर्दी होते. या मंदिरात जाण्यासाठी महाशिवरात्रीचा काळही चांगला मानला जातो. परंतू, श्री स्तंभेश्वर महादेव मंदिराला भेट देण्याची उत्तम वेळ म्हणजे पौर्णिमा किंवा पौर्णिमेची रात्र आहे, कारण यावेळी समुद्रात भरती-ओहोटी येते.