First Mangala Gauri Vrat 2024 : श्रावण महिन्यात अनेक उपवास आणि सण होतात. त्यापैकी एक म्हणजे मंगळा गौरी व्रत, जे श्रावण महिन्यातील दर मंगळवारी पाळले जाते. शिव-गौरींना समर्पित हे व्रत वैवाहिक जीवनाच्या रक्षणासाठी केले जाते. श्रावण मंगळा गौरीचे व्रत केल्याने संतानप्राप्तीची मनोकामनाही पूर्ण होते. श्रावणाच्या पहिल्या मंगळा गौरी व्रतासाठी उपाय, शुभ मुहूर्त आणि पूजेची पद्धत जाणून घेऊया.
श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी मंगळागौर पूजन केले जाते. नवविवाहीत महिलेने लग्नानंतर पहिली पाच वर्ष करावयाचे हे व्रत असते. पतीपत्नी मधील आत्यंतिक प्रेम व निष्ठेचा आदर्श म्हणून शिवपार्वती या दांपत्याकडे पाहिले जाते. त्यांचा आशिर्वाद असावा त्यांची कृपादृष्टी असावी या हेतूने ही पूजा केली जाते. यंदा ६ ऑगस्ट, १३ ऑगस्ट,२० ऑगस्ट, २७ ऑगस्ट आणि ३ सप्टेंबर हे श्रावणातले मंगळवार आहेत.
मंगळा गौरी व्रत मुहूर्त
अभिजित मुहूर्त- दुपारी १२:०० ते दुपारी १२:५४ पर्यंत
विजय मुहूर्त- दुपारी २:४१ ते दुपारी ३:३४ पर्यंत
गोधुली मुहूर्त- संध्याकाळी ७:८ ते ७:२९
सायाह्य संध्या - ७:८ ते ८:१२
अमृत काळ- दुपारी ३:६ ते दुपारी ४:५१ पर्यंत
अन्नपूर्णा देवीची मूर्ती चौरंगावर स्थापन करावी. सर्वप्रथम गणपतीपूजन, कलश-घंटा-दीप पूजन करून मंगळागौर किंवा अन्नपूर्णेच्या मूर्तीवर शिव-मंगलागौरीचे आवाहन करावे. यानंतर षोडशोपचारे पूजा करावी. काही ठिकाणी देवीला कणकेचे अलंकार वाहण्याची पद्धत आहे. नंतर देवीची अंगपूजा करुन देवीला विविध पत्री, फुले वाहावीत. नंतर तांदूळ, पांढरे तीळ, जिरे, मुगाची डाळ इ. धान्ये मूठीने अर्पण करावीत. धूप-दीप-नैवेद्य अर्पण करावा.
षोडशोपचार पूजा झाल्यावर सर्व प्रकारच्या संपत्ती प्राप्ती, दीर्घायुष्य, अखंड सौभाग्य प्राप्ती व सर्व मनोकामना पूर्ण होण्याकरिता देवीला तीन अर्घ्य द्यावीत. यानंतर मंगळागौरीची कथा वाचावी. देवीला नैवेद्य अर्पण करुन कणकेच्या सोळा दिव्यांनी व काडवातींनी आरती करावी. सायंकाळी पुन्हा देवीची आरती करून देवीसमोर पारंपारिक खेळ खेळून जागरण करावे.
तुमचे वैवाहिक जीवन अडचणींनी भरलेले असेल किंवा लग्नात काही अडथळे येत असतील तर मंगळा गौरीचे व्रत ठेवा. या दिवशी देवी पार्वतीला लाल वस्त्र अर्पण करा आणि सौभाग्याचे साहित्य अर्पण करा. पतीसह शिव आणि पार्वतीची पूजा केल्याने वैवाहिक जीवन चांगले राहते.