चातुर्मासातील व्रत-वैकल्यांचा काळ म्हणून श्रावण महिना ओळखला जातो. सोमवार ५ ऑगस्ट पासून पवित्र श्रावण महिना सुरू झाला असून, श्रावण महिना भगवान शिवाला समर्पित आहे. पण यासोबतच या महिन्यात माता पार्वती आणि गणपतीचीही पूजा केली जाते.
या श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवसाचे व वाराचे वेगवेगळे महत्त्व आहे. श्रावणी सोमवार, मंगळागौर, जिवतीची पूजा, नृसिंह पूजन, आदित्य राणूबाई पूजन यांप्रमाणे श्रावणातील प्रत्येक बुधवारी बुधाची आणि गुरुवारी बृहस्पतीची म्हणजे गुरुची पूजा केली जाते. बुध-बृहस्पती पूजन कसे करावे? जाणून घ्या.
यंदाच्या वर्षी ७ ऑगस्ट, १४ ऑगस्ट, २१ ऑगस्ट आणि २८ ऑगस्ट रोजी बुधपूजन केले जाईल तर ८ ऑगस्ट, १५ ऑगस्ट, २२ ऑगस्ट आणि २९ ऑगस्ट रोजी बृहस्पती पूजन करण्यात येईल.
बुध-बृहस्पती व्रतासाठी बुध आणि गुरुचे चित्र घेऊन किंवा बालस्ती रेखाटून त्याची पूजा केली जाते. दररोज घरातील देवतांची जशी पूजा केली जाते, तशीच साधी पूजा करावी. शेवटी दही-भाताचा नैवेद्य दाखवावा. हे व्रत सात वर्षे केले जाते. श्रावण महिन्याच्या सुरुवातीला जो जिवतीचा कागद चिकटवला जातो, त्यात बुध-बृहस्पतींचे चित्र रेखाटण्यात आले आहे. धनसंपदा, बुद्धिचातुर्य, विद्याधन हे सर्वांनाच हवे असते. ते देण्याबद्दल ज्यांचा लौकिक आहे, अशा बुध आणि बृहस्पती यांची ही पूजा अनेक घरात पूर्वापार परंपरेने केली जाते.
ॐ पूर्वकपिमुखाय पच्चमुख हनुमते टं टं टं टं टं सकल शत्रु सहंरणाय स्वाहा।
बुधवारी या मंत्राचा जप केल्याने शत्रूपासून मुक्ती मिळते. सकाळी स्नान केल्यानंतर भगवान शंकराला गंगाजल आणि शमीच्या पानांनी अभिषेक करावा. यानंतर या मंत्राचा २१ वेळा जप करा.
देवनम् च ऋषिं गुरुं कंचना-सन्निभं बुद्धि-भूतम् त्रिलोकेशन तम नमामि बृहस्पतिम ||
गुरुवारी हा मंत्र पहाटे ४ ते ६ या वेळेत करावा. या मंत्राचा १९००० वेळा जप करणे जास्त लाभदायक आहे. ह्या मंत्राचा जप करताना उत्तर किंवा पूर्व दिशेला बृहस्पती यंत्रासह बसावे.
बुधपूजनामुळे सर्व मनोकामना पूर्ण होतात.वैवाहीक जीवनात गोडवा वाढतो. सर्व अडथळे दूर होतात. व्यक्तीला आध्यात्मिक ज्ञान प्राप्त होते आणि व्यक्तीची जगात वेगळी ओळख निर्माण होते. कार्यक्षेत्रात यश मिळते. व्यक्ती भय आणि तणावाशिवाय जीवन जगू शकते.