मराठी बातम्या  /  धर्म  /  Shivrajyabhishek Program : शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त रायगड सजले! जाणून घ्या कुठे काय कार्यक्रम?

Shivrajyabhishek Program : शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त रायगड सजले! जाणून घ्या कुठे काय कार्यक्रम?

Jun 05, 2024 05:55 PM IST

Shivrajyabhishek Ceremony at Raigad : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. जाणून घ्या कुठे काय कार्यक्रम आहे.

शिवराज्याभिषेक सोहळा रायगड, कोल्हापूर, महाराष्ट्र
शिवराज्याभिषेक सोहळा रायगड, कोल्हापूर, महाराष्ट्र

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५१ वे वर्षे आहे. राष्ट्राचे अस्तित्व प्रस्थापित करून सबंध देशाला स्वातंत्र्याची नवी उर्मी आणि चैतन्यशक्ती प्रदान करण्याचे श्रेय निश्चितच छत्रपती शिवाजी महाराजांकडे जाते. त्यांच्या राज्याभिषेकामुळे सबंध देशामध्ये ‘मुद्रा भद्राय राजते’ म्हणजे जनतेच्या कल्याणाचे नवे पर्व सुरू झाले.

ट्रेंडिंग न्यूज

राज्याभिषेकानंतर महाराजांनी स्वतंत्र मोहिमा आखून सबंध दक्षिण भारत हिंदवी स्वराज्याखाली आणला. दक्षिणेतील अनेक नद्यांवर घाट बांधले, अनेक मंदिरांची स्थापना केली.

राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. दरवर्षी रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होतो. यंदा या सोहळ्यासाठी रायगडावर जय्यत तयारी झाली आहे.

शिवराज्याभिषेक महोत्सवाचे आकर्षण

दुर्गराज रायगडावर ५ व ६ जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होणार असून, यंदा ‘धार तलवारीची, युद्धकला महाराष्ट्राची’, ‘जागर शिवशाहीरांचा..स्वराज्याच्या इतिहासाचा’ व ‘सोहळा पालखीचा, स्वराज्याच्या ऐक्याचा’ कार्यक्रम शिवराज्याभिषेक महोत्सवाचे आकर्षण असणार आहेत.

यंदाच्या राज्याभिषेक सोहळ्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून शिवकालीन युद्ध कला असलेले चित्तथरारक मर्दानी खेळ आणि शाहीर दिलीप सावंत यांच्यासह तब्बल राज्यभरातील १६०० शाहिरांचा शाहिरी नजराना यावेळी सादर करण्यात येणार आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा पालखी सोहळा या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण बिंदू असणार आहेत.

प्रशासन आणि राज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने गडावर जोरदार तयारी करण्यात येत असून मुबलक पाण्याची व्यवस्था, निवासाची व्यवस्था आणि स्वच्छतागृहे ठिकठिकाणी उभे करण्यात येत आहे असे सांगितले जात आहे.

सुमारे २००० पोलिसांसह सातशे कर्मचारी तैनात

या सोहळ्यासाठी २००० पोलीस किल्ले रायगड आणि परिसरामध्ये तैनात राहणार आहेत, तर ७०० शासकीय कर्मचारी आणि १२० स्वयंसेवक या ठिकाणी काम करणार आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अतुल झेंडे यांच्यासह अन्य दोन पोलीस उपाधीक्षक, ११ पोलीस उपविभागीय अधीकारी, २८ पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक, १४० पोलीस उपजिल्हाध्यक्ष, ९०० पोलीस कर्मचारी १३५ वाहतूक पोलीस तसेच पोलीस दलाची विविध पथके या ठिकाणी दाखल होणार आहेत.

अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्यावतीने रायगडावर होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी लागणाऱ्या पवित्र जल संकलन मोहिमेचा मान कोल्हापूर हायकर्सला दिला आहे. या जल संकलन महिमेसाठी यावर्षी . जिंजी किल्ला (तामिळनाडू), तोरणा किल्ला, भुदरगड (कोल्हापूर जिल्हा) किल्ला, रांगणा किल्ला, मौनी महाराजांचे समाधी स्थळ, केदारनाथ (उत्तराखंड) मंदिराजवळील मंदाकिनी नदी, माना (उत्तराखंड) येथील सरस्वती नदी अशा सात ठिकाणांची निवड केली होती.

कोल्हापुरातील नवीन राजवाड्यामध्ये राज्याभिषेक सोहळा

याच दिवशी पहिल्यांदाच कोल्हापुरातील नवीन राजवाड्यामध्ये श्रीमंत शाहू महाराज छत्रपती आणि मालोजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत शिवराज्याभिषेक सोहळा होणार आहे. दिनांक ६ जून रोजी सकाळी साडेसात ते दहा या वेळेत नवीन राजवाडाच्या प्रांगणात राज्याभिषेक सोहळा रंगणार आहे. सनई चौघडा, झांज याच्या सोबतीत सुवर्णमूर्तीवर अभिषेक करण्यात येईल. यानंतर पोवाडा, शौर्य गीत, मराठी स्फूर्ती गीत आणि मर्दानी खेळांचा थरार पाहायला मिळणार आहे.

WhatsApp channel
विभाग