छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५१ वे वर्षे आहे. आज २० जून २०२४ रोजी, तिथीनुसार ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी दिवशी शिवराज्याभिषेक दिन साजरा केला जात आहे. शिवभक्तांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाच्या सोहळ्याबद्दलही दोन गट आहे. काहींच्या मते तो ६ जून दिवशी ग्रेगेरियन कॅलेंडरप्रमाणे साजरा केला जातो. तर काहींच्या मते तो ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी दिवशी साजरा केला जातो.
छत्रपती शिवाजी महाराजांना लहानपणापासूनच राजकारण आणि युद्धाचे प्रशिक्षण मिळाले होते, म्हणून ते जगातील महान योद्ध्यांपैकी एक मानले जातात. शिवाजी महाराजांनी लहान वयातच आपले कौशल्य आणि युद्धकौशल्य दाखवून दिले होते. तोरणा किल्ला जिंकला होता आणि त्यानंतर मुघलांकडूनही अनेक क्षेत्रे हिसकावून घेतली होती.
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे महान राजा आणि आराध्य दैवत मानले जातात. दरवर्षी देशभरात तसेच रायगडावर शिवराज्याभिषेक दिन हा उत्सव विशेष थाटामाटात साजरा केला जातो. आजही राज्यभरात तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक दिन वाजत गाजत आणि उत्साहात साजरा केला जात आहे.
रायगडावर आज ३५१वा शिवराज्यभिषेक सोहळा साजरा केला जात आहे. यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांसह महायुतीचे इतर मंत्री रायगडावर उपस्थित होते. सकाळी ८ वाजता ध्वजारोहण करण्यात आले आणि त्यानंतर मुख्यमंत्री यांच्या हस्ते शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला आहे.
यानिमित्ताने गडावर शिवभक्तांचा जल्लोष सुरू आहे. हा शिवराज्याभिषेक सोहळा भव्य दिव्य स्वरूपात साजरा होत आहे. गडावर झेंडूच्या फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली असून, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आकर्षक फुलांची आरास करण्यात आली आहे.
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवछत्रपतींच्या मूर्तीवर जलाभिषेक, सुवर्णभिषेक, पोलिस मानवंदना, पालखी मिरवणुक अशी संपुर्ण कार्यक्रमाची रूपरेषा आहे. धुक्याची चादर पसरली आहे आणि रिमझिम पावसाच्या हजेरीत हजारोंच्या संख्येने शिवभक्त गडावर दाखल झाले आहेत. या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त गडावर रणमैदानी खेळही सादर केले जाणार आहेत. हा शिवराज्यभिषेक सोहळा आकर्षणाचा भाग आहे.
दुर्गराज रायगडावर ५ व ६ जून रोजीही तारखेप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा साजरा झाला असून, यंदा ‘धार तलवारीची, युद्धकला महाराष्ट्राची’, ‘जागर शिवशाहीरांचा..स्वराज्याच्या इतिहासाचा’ व ‘सोहळा पालखीचा, स्वराज्याच्या ऐक्याचा’ हे कार्यक्रम शिवराज्याभिषेक महोत्सवाचे आकर्षण होते.
संबंधित बातम्या