मराठी बातम्या  /  धर्म  /  Shivrajyabhishek Din : शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त तुम्हालाही द्यायचंय भाषण? हे मुद्दे येतील उपयोगी

Shivrajyabhishek Din : शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त तुम्हालाही द्यायचंय भाषण? हे मुद्दे येतील उपयोगी

Priyanka Chetan Mali HT Marathi
Jun 05, 2024 03:14 PM IST

Shivrajyabhishek Din 2024 Speech : उद्या ६ जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. अनेकजण महाराजांबद्दल आपले प्रेमस्वरुपी मनोगत व्यक्त करत असतात. तुमचे मनोगत अथवा भाषण आणखी प्रभावी बनवण्यासाठी हे काही महत्वाचे मुद्दे तुम्हाला उपयोगी पडतील.

शिवराज्याभिषेक सोहळा भाषण
शिवराज्याभिषेक सोहळा भाषण

महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक माणसाच्या मनात शिवरायांबद्दल अतिशय प्रेम आणि आदराची भावना आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांना ओळखले जाते. आपला जन्म शिवरायांच्या पवित्र भूमीत झाल्याचं आपण नेहमीच अभिमानाने आणि छातीठोकपणे सर्वत्र सांगतो. उद्याचा दिवस प्रत्येक शिवभक्तासाठी प्रचंड खास आहे.

ट्रेंडिंग न्यूज

कारण उद्या ६ जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. महाराष्ट्रातील लहानांपासून-मोठ्यांपर्यंत प्रत्येक व्यक्तीला वर्षभर या सुवर्ण क्षणाची ओढ लागून असते. अखेर हा सुवर्णदिन अवघ्या एका दिवसावर येऊन राहिला आहे. अनेक लोक सामाजिक किंवा शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असतात. याठिकाणी ते महाराजांबद्दल आपले प्रेमस्वरुपी मनोगत व्यक्त करत असतात. तुमचे मनोगत अथवा भाषण आणखी प्रभावी बनवण्यासाठी हे काही महत्वाचे मुद्दे तुम्हाला उपयोगी पडतील.

छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा

महाराष्ट्राच्या इतिहासातील एक सोनेरी पान म्हणजे छ. शिवराज्याभिषेक सोहळा होय. प्रत्येक मराठी माणसासाठी हा दिवस अगदी सोनेरी दिवसच म्हणावा लागेल. यादिवसाबद्दल आजही लोकांमध्ये तितकेच प्रेम, आतुरता, श्रद्धा आणि आदर पाहायला मिळतो. ६ जून १६७४ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा रायगडावर संपन्न झाला होता.

यावर्षी शिवराज्याभिषेक सोहळ्याचे तब्बल ३५० वे वर्ष आहे. त्यामुळे यंदाचा राज्याभिषेक सोहळा अतिशय खास असणार आहे. मध्ययुगीन इतिहासात या दिवसाला अनन्यसाधारण असे महत्व आहे. मध्ययुगीन काळात देशावर परकीय शत्रूंचे वर्चस्व डोके वर काढत असताना. शिवरायांनी शूर कामगिरी करत लोकांना या गुलामगिरीतून सोडवत स्वातंत्र्याची पहिली पहाट जनतेला दाखवली होती. याकाळात शिवरायांनी लोकांना स्वातंत्र्याचा खरा अर्थ समजावला होता.

शिवरायांचे प्रभावी शासन

छत्रपती शिवरायांनी त्याकाळात चालवलेलया शासनपद्धतीचा आधार आजसुद्धा घेतला जातो. महाराजांनी त्याकाळात अष्टप्रधान मंडळ स्थापन करुन कारभार उत्तमरित्या चालवला होता. विशेष म्हणजे महाराजांनी वंशानुसार नव्हे तर गुणांनुसार हे मंडळ निवडले होते. अनंत सभासद यांनी लिहिलेल्या बखरीमध्ये शिवरायांच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय कर्तृत्वाबाबत अगदी बारकाईने वर्णन पाहायला मिळते. राजांचे शासन इतके पारदर्शक आणि चोख होते तिथे कोणत्याही शंकेला जागा नव्हती. त्याकाळातील महाराजांच्या शासनात असलेल्या राजव्यवहार कोश, आज्ञापत्र कोश यालाही महत्वाचे स्थान आहे. महाराजांचे शासन त्यांनी आखलेल्या या कायद्यांच्या चौकटीत चालत असे. या शासनव्यवस्थेत गरिबांच्या भाजीच्या देठालासुद्धा हात लावायची कोणाची हिंमत नसायची. अत्यंत दीनदुबळ्या लोकांनासुद्धा महाराजांच्या राज्यात संरक्षण मिळत असे. त्यामुळेच शिवरायांची कीर्ती इतकी महान आहे.

शिवराज्याभिषेकाचे ऐतिहासिक महत्व

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला इतिहासासोबतच लोकांच्या मनात अनन्यसाधारण महत्व आहे हे आपण जाणतोच. मात्र यामागे असलेले ऐतिहासिक महत्व जाणून घेऊया. ''मराठी सत्तेचा उदय आणि उत्कर्ष'' या न्या. महादेव गोविंद रानडे यांच्या ग्रंथामध्ये याबाबतचे महत्व अधोरेखित करण्यात आले आहे. छ. शिवरायांनी स्वराज्य स्थापित करत देशाच्या इतिहासाला नवसंजीवनी दिली होती.

परकीय आक्रमणातील धूर्त आणि दुष्ट शत्रूंचा नायनाट करुन देशाचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचे मौल्यवान कार्य राजेंनी केलं होतं.शिवराज्याभिषेक हा गोरगरीब, दीनदुबळ्या जनतेच्या नवआयुष्याचा आणि उत्साहाचा सार सांगणारा सोहळा होता. शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याने सामाजिक न्याय, बंधुता आणि विशेष म्हणजे स्वातंत्र्याचा पाया रचला होता.

WhatsApp channel