Shirdi Saibaba Temple: गेल्या दीर्घ काळापासून साईभक्त ज्या गोष्टीची वाट पाहत होते ती गोष्ट अखेर घडली आहे. ती म्हणजे आता साईभक्त शिर्डीच्या साईबाबांच्या समाधीवर फुले आणि हार वाहू शकणार आहेत. याचे कारण म्हणजे करोना काळात फुले, हार इत्यादी वाहण्यावर घालण्यात आलेली बंदी आता उच्च न्यायालयाने उठवली आहे. त्यामुळे साईबाबांच्या समाधीवर आता भक्तांना हार, फुले चढवता येणार आहेत. यामुळे साईभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
करोनाच्या काळात संसर्गावर नियंत्रण ठेवता यावे यासाठी शिर्डीच्या साईबाबांच्या मंदिरात समाधीवर हार आणि फुले अर्पण करण्यावर बंदी घालण्याच आली होती. या बंदी मुळे एकतर भक्तांना आपली भक्ती हार, फुले अर्पण करण्याच्या माध्ममातून व्यक्त करता येत नव्हती. शिवाय शिर्डी परिसरातील फुल उत्पादक शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान होत होते. ही बंदी उठवण्यात यावी यासाठी अनेक सामाजिक आणि राजकीय संघटनांनी आंदोलने देखील केली. मात्र तरीदेखील ही बंदी उठवण्यात आलेली नव्हती.
पुढे राहता कृषी उत्पन्न बाजार समितीने उच्चन्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यानंतर आता औरंगाबाद खंडपीठाने फुले, हार आणि प्रसादावरील बंदी उठवली आहे. खंडपीठाच्या या निर्णयानंतर शिर्डीच्या साई संस्थान प्रशासनाने नियमावली तयार केली असून त्यानुसार कालपासून साईबाबांच्या समाधीवर फुले, हार अर्पण करण्याची परवानगी दिली आहे.
औरंगाबाद खंडपीठाच्या या निर्णयानंतर साईबाबा संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटीच्या वतीने फुलहार प्रसाद केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राचे उद्घाटन काल गुरुवारी माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. ना नफा, ना तोटा तत्त्वावर सोसायटीचे हे फुलप्रसाद केंद्र चालवले जात आहे. या केंद्रावर साई भक्तांना अत्यंत माफक दरामध्ये फुले, हार, प्रसाद खरेदी करता येणार आहे.
साईबाबा समाधी मंदिरात साईबाबांते लाखो भक्त येत असतात. त्यांना मोठ्या प्रमाणात फुले, हार हवे अशतात. यासाठी शिर्डीत फुलविक्रीची मोठी उलाढाल होत असते. यासाठी शिर्डी परिसरामध्ये मोठ्या संख्येने शेतकरी फुलाचे उत्पादन करतात. मात्र कोरोनाच्या काळापासून फुले, हार आणि प्रसादावर बंदी घालण्यात आली. त्यानंतर इथला फुल उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला. त्यामुळे शिर्डीच्या अर्थकारणाला देखील विपरित परिणाम झाला. मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशाने आता साईबाबांच्या समाधी मंदिरात फुले आणि हार अर्पण करणे सुरू झाले आहे. यामुळे आता फुल उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहावयास मिळत आहे.
संबंधित बातम्या