Shirdi Sai Baba Mandir News In Marathi : शिर्डी हे एक लोकप्रिय धार्मिक पर्यटन स्थळ आहे जिथे दररोज मोठ्या संख्येने पर्यटक येतात. शिर्डी येथील साईबाबांच्या दर्शनासाठी दररोज भाविकांची मोठी रीघ लागते. अशात या भाविकांची उत्तम व्यवस्था व्हावी यासाठी शिर्डी साईबाबा संस्थानच्या वतीने अनेक सुख-सुवीधा पुरवल्या जातात. आता शिर्डी साईबाबा संस्थानाने मोफत अन्न प्रसादाबद्दल एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
शिर्डी श्री साईबाबा संस्थानाने मोफत प्रसाद भोजनाबाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शिर्डी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता साई बाबांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना टोकन पद्धतीने मोफत भोजन दिले जाणार आहे. साई प्रसादालयात मोफत भोजनासाठी भाविकांना आता कूपन दिले जाणार आहे. साईबाबांच्या दर्शनानंतर रांगेतील उदी काऊंटरवर हे कूपन वितरित केले जाणार आहेत. शिर्डी संस्थानमध्ये दाखल होणाऱ्या भाविकांना भोजन प्रसादासाठी आता कूपन घेणं बंधनकारक करण्यात आलं आहे. सध्या शिर्डीत वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून, इथे येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठीच हा निर्णय घेतल्याचं यावेळी सांगण्यात आलं.
शिर्डीत दुहेरी हत्याकांडाची धक्कादायक घटना घडली. शिर्डीत साईबाबा संस्थानमध्ये काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांच्या हत्येनंतर आता हा मोठा निर्णय घेण्यात आला असून, शिर्डीतली वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत.
शिर्डी साईबाबा संस्थानामार्फत आशिया खंडातलं सर्वात मोठं प्रसादालय चालवलं जातं. गेल्या कित्येक वर्षांपासून शिर्डीत श्री साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर भाविक साई प्रसादालयात मोफत भोजनाचा लाभ घेतात. इथे दररोज ४५ ते ५० हजार भाविक प्रसादाचा लाभ घेतात. मात्र आता या प्रसादालयात जेवणासाठी कूपन आवश्यक असणार आहे. कारण काही लोक दारू पिऊन प्रसादालयात येतात. धूम्रपान करतात. त्यामुळे तिथे प्रसाद घेणाऱ्या भाविकांना त्रास होतो अशा काही तक्रारी संस्थानाकडे दाखल झाल्या होत्या. यामुळे संस्थानाच्या वतीने हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
साईभक्तांना शिर्डीला साईदर्शनास येणे सुलभ व्हावे, कोणत्याही साईभक्तांची गैरसोय होऊ नये, स्वत:च्या इच्छेप्रमाणे दैनंदिन पूजाविधीत सहभागी होता यावे यासाठी विश्वस्तव्यवस्था प्रयत्नशील असते. यावेळी कोणत्याही कारणाने कोणताही भक्त भोजनाशिवाय राहणार नाही याची पूर्ण दक्षता घेत साईबाबा संस्थानने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे.
संबंधित बातम्या