Shardiya Navratri Fast Rules : पितृपक्ष संपल्यानंतर ओढ लागते ती नवरात्रोत्सवाची. हिंदू धर्मात नवरात्रीला फार महत्व आहे. नवरात्री म्हणजे नऊ रात्र देवीची पूजा आणि उपवास करण्याला खास महत्व आहे. शारदीय नवरात्रीचा पवित्र सण गुरुवार, ३ ऑक्टोबर २०२४ पासून सुरू होत आहे, जो १२ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. या वर्षी नवरात्रीचा पहिला दिवस गुरुवारी येत असल्यामुळे देवी पालखीत स्वार होऊन येईल.
नवरात्रीचे नऊ दिवस दुर्गा देवीच्या विविध नऊ रूपांची पूजा करण्याची परंपरा आहे. नवरात्रीच्या काळात दुर्गादेवीला प्रसन्न करण्यासाठी भाविक विधीपूर्वक पूजा करतात आणि उपवास करतात. असं म्हणतात देवीची उपासना करण्याचे फार कडक नियम आहेत. त्यामुळे नवरात्रीचे व्रत नियमानुसारच पाळावे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी उपवासाचा संकल्प करून घटस्थापना करावी.
हिंदू धर्मग्रंथानुसार उपवासाचे नियम पाळणे महत्त्वाचे आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या उपवासात लोक खिचडी, फळे आणि इतर उपवासाचे पदार्थ खातात. काही ठिकाणी अनवानी म्हणजे चप्पल न घालता हे व्रत पाळले जाते. आपल्या परंपरेनुसार नवरात्रीचे हे व्रत केले जाते. याशिवाय व्रत पाळण्याचे इतरही काही नियम धार्मिक ग्रंथांमध्ये सांगितले आहेत. जाणून घ्या नवरात्रीच्या उपवासात कोणते नियम पाळावेत-
नवरात्रीचे व्रत करणाऱ्या व्यक्तीने ब्रह्मचर्य पाळावे.
नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये खोटे बोलू नये आणि राग टाळावा.
या नऊ दिवसांमध्ये कोणत्याही प्रकारे स्त्री किंवा मुलीचा अपमान करू नये.
साधारणपणे लोक दिवसातून दोनदा भरपूर फराळ केल्यानंतर उपवास करतात. पण असे करू नये, उपवास केल्याचे फळ मिळत नाही, असे मानले जाते. उपवास करतो तर तो भक्तीभावे करावा आणि एक वेळ ठरवून फराळ करावा.
नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये उपवास करणाऱ्या व्यक्तीने तामसिक पदार्थ, गुटखा, पान, मसालेदार अन्न किंवा मांस आणि दारूचे सेवन करू नये. उपवास करताना वारंवार पाणी पिणे देखील टाळावे.
नवरात्रीचे व्रत मध्यंतरी मोडू नये. काही गंभीर समस्या किंवा अडचण असल्यास देवीजवळ क्षमाप्रार्थना करूनच उपवास सोडावा.
जर तुम्ही सप्तमी, अष्टमी किंवा नवमी तिथीला नवरात्रीचे व्रत सोडले तर उपवासाचे उद्यापण करून नऊ कुवाऱ्या मुलींची पूजा करून त्यांना भेट वगैरे देऊन त्यांचा निरोप घ्यावा. असे केल्यानेच उपवासाचे फळ मिळते असे मानले जाते.
टीप : ही माहिती केवळ श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.