आश्विन पौर्णिमेला ‘कोजागरी पौर्णिमा’, ‘नवान्न पौर्णिमा’ किंवा ‘शरद पौर्णिमा’ या नावांनी ओळखले जाते. ज्या दिवशी पौर्णिमा पूर्ण होते, त्या दिवशी ‘नवान्न पौर्णिमा’ साजरी केली जाते. आश्विन पौर्णिमेला उत्तररात्री लक्ष्मीदेवी ‘को जागर्ति’ म्हणजे ‘कोण जागत आहे ?’, असे विचारते; म्हणून या पौर्णिमेला ‘कोजागरी पौर्णिमा’ असे म्हणतात. आज बुधवार १६ ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाईल.
या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वांत जवळ असतो. या दिवशी देवी लक्ष्मी आणि इंद्रदेवता यांचे पूजन करतात. यामुळे लक्ष्मीकृपेने सुखसमृद्धी प्राप्त होते. रात्री दुधात चंद्राचे दर्शन घेतल्याने चंद्राच्या किरणांच्या माध्यमातून अमृतप्राप्ती होते. याचे कारण ‘आश्विन पौर्णिमा’ अश्विनी नक्षत्रात चंद्र असतांना होते. अश्विनी नक्षत्राची देवता ‘अश्विनीकुमार’ आहे. अश्विनीकुमार सर्व देवतांचे चिकित्सक (वैद्य) आहेत. अश्विनीकुमारांच्या आराधनेमुळे असाध्य रोग बरे होतात. यामुळे वर्षातील इतर पौर्णिमांच्या तुलनेत आश्विन पौर्णिमेला चंद्रदर्शनाने त्रास होत नाही.
वैदिक पंचांगानुसार, अश्विन महिन्याची पौर्णिमा तिथी प्रारंभ आज १६ ऑक्टोबर २०२४ रात्री ८ वाजून ४० मिनिटांनी होणार आहे. तर, याची समाप्ती पुढच्या दिवशी म्हणजेच १७ ऑक्टोबरच्या दिवशी संध्याकाळी ४ वाजून ५५ मिनिटांनी होणार आहे.
कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दान, स्नान करणं फार शुभ मानलं जातं. ज्योतिष शास्त्रात, अशा काही गोष्टींचं वर्णन करण्यात आलं आहे की, ज्या गोष्टी दान केल्याने सुख-संपत्ती आणि सौभाग्य वाढतं तर काही गोष्टी आपण कधीच कोणालाही दान करु नयेत असेही सांगितले जाते.
स्कंद पुराणानुसार, अश्विन महिन्यातील पौर्णिमेला म्हणजे सायंकाळी दीपदान करण्यासंदर्भात उल्लेख असल्याचे पाहायला मिळते. पणती हे अज्ञानाचा अंध:कार दूर करण्याचे आणि तेज, समृध्दी यांचे प्रतीक असल्याने दीपदानाचे महत्त्व मोठे आहे, असे मानले जाते. आकाश दीपदान केल्याने लक्ष्मी-नारायणाचे शुभाशिर्वाद प्राप्त होतात. लक्ष्मी देवी प्रसन्न करण्यासाठी पौर्णिमेला दीपदान करण्याची प्राचीन परंपरा प्रचलित असल्याचे दिसून येते.
धार्मिक मान्यतेनुसार, कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तांदूळ, गूळ, खीर यांचं दान करणं शुभ मानलं जातं. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी या गोष्टी जर तुम्ही दान केल्या तर यामुळे तुमची आर्थिक चणचणपासून सुटका होऊ शकते. तसेच, तुमच्या आयुष्यात सकारात्मकता वाढण्याची शक्यता असते.
तसेच, आजच्या दिवशी चुकूनही कोणाला दही दान करु नये. यामुळे तुमच्या आयुष्यात अनेक प्रकारची संकटं येऊ शकतात. तुमच्या आयुष्यातून सुख-शांती निघून जाऊ शकते. ज्योतिष शास्त्रानुसार मानल्यास यामुळे तुम्हाला शुक्रदोषही लागण्याची शक्यता आहे.
आजच्या दिवशी चुकूनही लोखंडाचं सामान कोणाला दान करु नका. एखाद्याला लोखंड दान करणं शुभ मानलं जात नाही. मान्यतेनुसार, लोखंडाचं दान केल्याने शनीदोष लागतो. त्याचबरोबर आयुष्यात तुम्हाला अनेक संकटांचा, आव्हानांचा सामना करावा लागतो.
आजच्या दिवशी मीठ दान करणं फार अशुभ मानलं जातं. यामुळे तुमच्या आयुष्यात खूप नकारात्मकता येऊ लागते. तसेच, तुम्ही या काळात कोणतंही नवीन काम सुरु करु शकत नाहीत.