
Kojagiri purnima date time muhurat : हिंदू धर्मात सण-उत्सवांना आणि व्रतवैकल्यांना जितकं महत्त्व आहे, तितकंच महत्त्व वर्षभरात येणाऱ्या पौर्णिमा आणि अमावस्येला आहे. काही अमावस्या आणि पौर्णिमा या विशेष महत्त्वाच्या मानल्या जातात. अश्विन महिन्यातील पौर्णिमा ही यापैकीच एक आहे.
या पौर्णिमेला धर्मशास्त्रात खास स्थान आहे. अश्विन महिन्यात शरद पौर्णिमा (Sharad Purnima) साजरी केली जाते. ही पौर्णिमा देशातील विविध राज्यांत वेगवेगळ्या नावांनी साजरी केली जाते. तिला कोजागिरी पौर्णिमा, रास पौर्णिमा आणि कौमुदी व्रत असंही म्हणतात. शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ असतो आणि या रात्री चंद्राच्या शीतल प्रकाशातून अमृतवर्षाव होतो, असं मानलं जातं. त्यामुळं कोजागिरीच्या रात्री खीर चांदण्यात ठेवली जाते. त्यावर चंद्रकिरण पडल्यामुळं ती खीर प्रसाद म्हणून खाल्ली जाते. त्यामुळं लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो असं म्हणतात. शरद पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मी मातेची पूजा केली जाते. घर स्वच्छ, सुंदर, प्रसन्न ठेवलं जातं. या रात्री लक्ष्मी येऊन आपलं घर ऐश्वर्यानं भरून टाकते, असं मानतात.
यंदा कोजागिरी पौर्णिमा २८ ऑक्टोबर रोजी आहे. शनिवारी पहाटे ४ वाजून १७ मिनिटांनी पौर्णिमा सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी २९ ऑक्टोबर रोजी पहाटे १ वाजून ५३ मिनिटांनी संपेल.
पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळी करून स्वच्छ कपडे घाला.
घरातील चौरंगावर पिवळे किंवा लाल कापड अंथरा. त्यावर भगवान सत्यनारायणाची प्रतिमा ठेवा. त्यानंतर सत्यनारायणाला पिवळी फुले, पिवळे वस्त्र, पिवळे फळ, पिवळा धागा, सुपारी आणि हळद अर्पण करा.
देवासाठी केलेल्या नैवेद्यात तुळशीचं पानं टाका. विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा.
चंद्र आणि देवी लक्ष्मीशी संबंधित मंत्रांचा जप करा.
कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मीचीही पूजा केली जाते. यंदा लक्ष्मी पूजनासाठी दिवसा आणि रात्री तीन शुभ मुहूर्त आहेत. सर्वात चांगला मुहूर्त ८.५२ ते १०.२९ हा आहे. अमृत-सर्वोत्तम मुहूर्त १०.२९ ते १२.०५ असा आहे आणि तिसरा मुहूर्त १२.०५ ते १.४१ दरम्यानचा आहे. या तीन मुहूर्तांपैकी कोणत्याही वेळी लक्ष्मी पूजन करता येणार आहे.
संबंधित बातम्या
