बुधवार दि.२४ जानेवारी रोजी रात्री ९ वाजून ४९ मिनिटांनी पौर्णिमा प्रारंभ होत आहे व गुरुवारी गुरुपुष्यामृत योगात रात्री ११ वाजून १३ मिनिटांनी समाप्त होत आहे. पौर्णिमा म्हणजे भगवान विष्णू श्री सत्यनारायण व श्री महालक्ष्मी मातेच्या पूजन व सेवेचा शुभ काळ. या कालावधीत काय करावे व श्री माता भगवती व महालक्ष्मीच्या कृपेचा अनुभव कसा घ्यावा जाणून घ्या.
घरच्या घरी गुरुवारी शुभ पुण्यकाली, प्रदोषकाळी संध्याकाळी श्री सत्यनारायण पूजन तसेच देव्हाऱ्यात शास्त्रोक्त पूजन करून स्थापीत केलेले श्रीयंत्र, कुबेरयंत्र व रुद्र यंत्र पूजन करावे. सत्यनारायण पोथी प्रमाणे स्वतः घरीच सत्यनारायण पूजा करावी. शिऱ्याच्या प्रसाद करावा.
किमान १६ वेळेस श्री सुक्त पठण करावे.(बेलाच्या झाडाखाली बसून उत्तर दिशेकडे तोंड करून पठण करता आले तर अती पुण्यदायी).
श्रीयंत्रपूजन व कुंकुमार्चन - श्री ललिता सहस्त्रनाम पठण व श्री सूक्त पठण करत श्री यंत्रावर पाच बोटांनी कुंकू वहावे.
श्री कुबेर गायत्री मंत्र पठण करीत श्री कुबेर यंत्र पूजन ( विधिवत पूजन करून स्थापीत केलेले कुबेर यंत्र असावे ) करावे.
श्री विष्णुसहस्त्रनामपाठ, गीतेचा पंधरावा अध्याय, श्री व्यंकटेश स्तोत्र यांचे वाचन व एक माळ श्री विष्णुगायत्री मंत्र जप करावा.
टीप :- प्रदोष काळातच सत्यनारायण पूजन करणे. ईतर सेवा पौर्णिमेच्या पुण्यकाळातच करावे. घरातील सर्व सदस्यांनी मिळून वेळेप्रमाणे दिलेल्या सेवेपैकी थोडी थोडी वाटून सेवा केली तरी चालते. सत्यनारायण पूजन करतानाच श्रीयंत्र व कुबेरयंत्र व रुद्र यंत्र चौरंगावर मांडावे.
या सेवेने लक्ष्मी प्राप्ती,उत्तम आरोग्य व वास्तूत सकारात्मकता निर्माण होते. वास्तू दोष खूप कमी होतो.
या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करावे. देवीची आराधना करावी आणि नंतर विधीपूर्वक देवीची पूजा करावी. देवीची स्थापना करुन पूजा आणि आरती करावी. देवीला ताजे फळं आणि भाज्यांचे नैवेद्य दाखवावे आणि गंगा जल शिंपडावे. नंतर मंदिरात जाऊन प्रसाद दाखवावा आणि गरजू लोकांना दान करावे. या दिवशी शाकंभरी देवीची कथा करावी.