आज २५ जानेवारी २०२४ रोजी पौष पौर्णिमा असून, ही पौर्णिमा शाकंभरी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. आज गुरु पुष्य योगही आहे. तसेच, आजपासून माघस्नानारंभ होत आहे. यानिमीत्त अनेक मंदिरात, मठात देवीची पूजा व देवीला भाज्यांचा नैवेद्य दाखवला जात आहे व दुर्गासप्तशतीचे पठण केले जात आहे. भगवती देवीचे रुप असलेल्या शाकंभरी देवीच्या नावे पौष पौर्णिमा का साजरी केली जाते वाचा कथा. तसेच, शाकंभरी देवीची आरती म्हणा.
प्राचीन काळी पृथ्वीवर एक राक्षस होता. त्याचे नाव होते दुर्गमासुर. ऋषीमुनींचे सामर्थ्य श्रेष्ठ मंत्रशक्तीत होते. दुर्गमासुर ह्या गोष्टीचा नेहमी शोध घेण्यात व्यग्र होता आणि शत्रूच्या पाडावासाठी सतत ध्यान करत असे. एकदा विनाशकारी शक्तीने दुर्गमासुराला प्रेरणा दिली.
मग दुर्गमासूर ब्रह्मदेवाच्या प्रसन्नतेसाठी तीव्र तप करु लागला. त्याच्या तपस्येने ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि समोर प्रकट होऊन म्हणाले, ‘‘असुरा, मी प्रसन्न आहे. वर माग.’’
हात जोडून असूर म्हणाला, ‘‘देवा, संपूर्ण वेद, मंत्रशक्ती ज्ञानासह माझ्या हातात यावी. देवतांना मी पराभूत करावे.’’ ब्रह्मदेवांनी राक्षसाची धूर्तता जाणली. ते हसले आणि म्हणाले, ‘‘तथास्तु.’’
या एकाच शब्दाने या संपूर्ण सृष्टीमध्ये भयानक हाहाकार माजला. देव, मानव आणि ऋषी यांच्या जीवनाला आधार देणारे, मनाला चैतन्य देणारे संपूर्ण वेदज्ञान त्यांच्याकडे राहीले नाही आणि ते दुर्गमासुराकडे आले. सर्व मंत्रशक्ती सर्व सामर्थ्यासह असुराध्ये प्रविष्ट झाली. दुर्गमासुर उन्मत्त बनला. मानवांच्या हत्याकांडाचे भयानक पर्व सुरु झाले.
सर्व देव, मानव अंधाऱ्या गुहेत लपले. त्यांनी श्रध्देची कास धरली. बाहूतील शक्ती नष्ट झाली होती, बुध्दीचे सामर्थ्य नष्ट होते; पण मनामध्ये खोलवर रुजलेली श्रध्दा कधीही नष्ट होणे शक्य नाही. ही मनातली निर्मळ श्रध्दा या अंधाऱ्या गुहेत जागी झाली. उपासनेला यश आले. सर्वांच्या समोर भगवती प्रकट झाली. आगळे-वेगळे आणि भव्य सृष्टीमधील उंच-उंच पर्वत, डोंगर, हिरवीगार झाडेझुडे, नानारंगी फुले, पाने, रसरशीत डौलदार फळे या सर्वांची मिळून देवी तयार झाली. रुप विविधरंगी; पण तेजस्वी. जिकडे पहावे तिकडे देवीचे तेजस्वी डोळे दिसत होते. देवीच्या शंभर नेत्रांमधून कृपामृताचा वर्षाव होऊ लागला. या वर्षावामुळे सर्वजण उल्हासित झाले. नवे जीवन मिळाले.
देवीने अनेक प्रकारच्या भाज्या, फळफळावळ आणि अन्न तयार केले. अनेक रुचकर पदार्थ तयार केले. आईच्या मायेने सर्वांना पोटभर खाऊ घातले. सर्वांना तृप्त केले. या देवीला सर्वजण ‘‘शाकंभरी’’ देवी असे म्हणू लागले. शाकंभरी देवीला शताक्षी सुध्दा म्हटले आहे. सहस्र नेत्रांनी कृपादृष्टीने पाहीले त्यामुळे शताक्षी नावरूपास आले.
यानंतर देवी गुहेच्या बाहेर आली. तीने गुहेच्या तोंडावर मोठे तळपते चक्र ठेवले. या चक्रामुळे गुहेतील सर्वांचे रक्षण होत होते. देवीने आपली शस्त्रेअस्त्रे बाहेर काढली आणि तिने दुर्गमासुराला युध्दासाठी आव्हान दिले. दुर्गमासुर आपल्या सैन्यासह लढू लागला; पण देवीच्या समोर कोणाचाही टिकाव लागला नाही. जगावरील मोठे संकट नाहीसे झाले.
सर्व ज्ञान मंत्रसामर्थ्यासह देवांकडे, ऋषीमुनींकडे आणि मानवांकडे परत आले. देवी त्यांना म्हणाली, ‘‘हे श्रेष्ठ ज्ञान आहे. हीच माझी वाणी आहे. ही माझी मंत्रशक्ती आहे. हेच माझं एक स्वरुप आहे. ज्ञानाची उपासना करा. मंत्रशक्तीची आराधना करा. एवढे बोलून देवी अंतर्धान पावली.
म्हणून प्रजेच्या रक्षणासाठी धान्य निर्माण करणाऱ्या श्री शाकंभरीदेवीच्या श्रद्धेने पौष मासातील पौर्णिमा "शाकंभरी पौर्णिमा" म्हणून साजरी केली जाते.
शताक्षी, बनशंकरी, चामुंडा काली
दुर्गम, शुंभ निशुंभा स्वर्गी धाडियली
येतां भक्ता संकट धावुनी ही आली
दु:खे नाशुनि सकला सुखी ठेविली ॥१॥
जयदेवी जयदेवी जय शाकंभरी ललिते
अज्ञ बालकावरी त्वा कृपा करी माते ॥धृ॥
मधुकैटभ, महिषासुर मातले फार
दुर्गारूपाने केलास दानव संहार
शक्ती तुझी महिमा आहे अपार
म्हणूनि वंदन करिती ब्रह्मादिक थोर ॥२॥
अवर्षणाने जग हे झाले हैराण
अन्नपाण्याविना झाले दारूण
शरिरातुनि भाज्या केलिस उत्पन्न
खाऊ घालुनि प्रजा केलीस पालन ॥३॥
चंडमुंडादिक भैरव उद्धरिले
भानू ब्राह्मणासी चक्षु त्वा दिधले
नृपपद्माचे त्वा वंश वाढविले
अगाध लीला माते करून दाखविले ॥४॥
पाहुनी माते तुजला मन होते शांत
मी पण् उरे न काही मानव हृदयात
प्रसन्न चित्ते राही तुझ्या क्षेत्रात
ब्रह्मानंदी निमग्न होतो तुझा भक्त ॥५॥
वसंत प्रार्थी शंकरी शाकंभरी तुजसी
आलो शरण तुला मी आशिष दे मजसी
अखंड सेवा घडु दे इच्छा उरी ऐसी
अंती सद्गती द्यावे मम या जीवासी ॥६॥