Tuljabhavani Devi Mandir In Marathi : शारदीय नवरात्र महोत्सवाप्रमाणेच शाकंभरी नवरात्र महोत्सव काळातही तुळजापुरातील तुळजाभवानी मंदिरात नवरात्रोत्सव रंगतो. या वर्षी मंगळवार ७ जानेवारी ते १३ जानेवारी २०२५ पर्यंत शाकंभरी नवरात्रोत्सव साजरा केला जात आहे.
शाकंभरी नवरात्रनिमित्त सात दिवसाच्या मंचकी निद्रेनंतर मंगळवार ७ जानेवारी रोजी, दुपारी १२ वाजता कुलस्वामिनी तुळजाभवानी देवी मंदिरात सिंहासनावर देवीच्या मूर्तीची गाभाऱ्यात प्रतिष्ठापना करण्यात आली. देवीच्या जयघोषात महंत, पुजारी आणि मानकर्यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली.
तुळजापूर हे महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यातले शहर आहे. येथे तुळजाभवानीचे प्रसिद्ध मंदिर असून, ते महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन पीठांपैकी एक असल्याची हिंदू भाविकांची श्रद्धा आहे. महाराष्ट्रातील हिंदू भाविकांमध्ये या देवीस विशेष महत्त्व असून, नवरात्रात येथे मोठा उत्सव व भक्तांची गर्दी असते.
असे सांगितले जाते की, तुळजाभवानी देवीने दैत्याशी युदध केले. दैत्यही महिषाचे रूप घेऊन आला. तेव्हा देविने त्रिशुळाने त्याचे शीर वेगळे केले. ही भवानी देवी वेळीच अनुभूतीच्या रक्षणासाठी त्वरित धावून आल्यामुळे तिला त्वरिता असे नाव पडले. कालांतराने त्वरिताचे-तुरजा व त्याचे पुढे तुळजा झाले.
उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तीर्थ समुद्रसपाटीपासून २६०० फुट इंच असून, येथील भवानी मातेचे मंदीर बालाघाट डोंगरच्या कडेपठारावर वसले आहे. या डोंगराचे पुराण ग्रंथातील जुने नाव यमुनागिरी असे होते. कालांतराने या स्थानी चिंचेची झाडे असल्यामुळे त्याचे नामकरण चिंचपूर झाले. नंतर तुळजाभवानीच्या नावाने लोक तुळजापूर म्हणू लागले. छत्रपती शिवाजी महाराज यांची ही कुलदेवी असल्याचे सांगितले जाते. संपूर्ण भारतात कुलदेवी म्हणून या देवीला मान आहे.
कृतयुगात अनुभूतीसाठी, त्रेतायुगात -श्रीरामचंद्रासाठी, द्वापारयुगात - धर्मराजासाठी व कलियुगात-छत्रपती शिवरायांसाठी आशीर्वादरूप ठरलेली ही भवानी भक्ततारिणी, वरप्रसादिनी आहे. अनेक प्रदेशांतून विविध जाती-पंथांचे भाविक इथे येतात. एवढेच नव्हे तर मातेचे भक्त भारतातच नव्हे तर परदेशातही आहेत.
गाभाऱ्याच्या उत्तरेस शयनगृह असून, त्यात मातेसाठी एक चांदीचा पलंग ठेवला आहे. तसेच, दक्षिण दिशेला देवीचे न्हाणीघर आहे. आश्विन शुद्ध प्रतिपदा ते अष्टमी, पौष शुद्ध प्रतिपदा ते अष्टमी व भाद्रपद वद्य अष्टमी ते अमावस्या अशी देवीची तीन शयन वर्षे ठरली असून, इतर वेळी ती अष्टौप्रहर जागृत असते. भारतात एक मात्र मुर्ती जी स्थलांतरित आहे. देवी वर्षातून तीन वेळा नीद्रा घेते. दोन वेळा चांदीच्या पलंगावर व एक वेळा नगर वरुण पलंग येतो.
मंगळवारपासून देवीच्या शाकंभरी नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला असून, नवरात्र काळात नित्योपचार पूजा, अलंकार महापूजा आणि रात्री छबिना पार पडणार आहे. तसेच, शाकंभरी नवरात्रीनिमित्त देवीची नित्योपचार पूजा व धार्मिक कार्यक्रम पार पडत आहे. सोमवार, १३ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता घटोत्थापन आणि रात्री छबिना मिरवणूक व जोगवा कार्यक्रमाने नवरात्र महोत्सवातील मुख्य कार्यक्रमाची सांगता होईल.
संबंधित बातम्या