Shakambhari Navratri Story In Marathi : पौष शुक्ल अष्टमीपासून पौष पौर्णिमेपर्यंत शाकंभरी नवरात्र साजरा केला जातो. यंदा हा उत्सव ७ जानेवारी ते १३ जानेवारी दरम्यान साजरा केला जात आहे. प्रत्येक चांद्रमहिन्याच्या पौर्णिमेला काही तरी विशेष महत्त्व आहे. यंदा १३ जानेवारीला ‘शाकंभरी पौर्णिमा ‘ आहे. शाकंभरी देवीचा हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने व पारंपरिक उत्साहाने साजरा केला जातो.
भारताच्या विविध प्रांतांसोबतच महाराष्ट्रातही शाकंभरी देवीची पूजा केली जाते. महाराष्ट्रातील काही देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मणांची ही कुलदेवी आहे. शाकंभरी देवीला 'बनशंकरी' असे आणखी एक नांव आहे. शताक्षी म्हणजेच शंभर डोळे असलेली देवी शाकंभरी आहे. ती दुर्गेचा कोमल अवतार आहे. देवी ‘शाकंभरी’ हे आदिशक्ती जगदंबेचे रूप मानले जाते. काही ठिकाणी ती चार हात असलेली देवी म्हणून तर काही ठिकाणी आठ हात असलेली देवी म्हणून दाखवली आहे.
देवीभागवत ग्रंथामध्ये शाकंभरी देवीच्या उत्पत्तीबद्दल दिलेल्या माहितीनुसार, एकदा खूप मोठा दुष्काळ पडला. लोक अन्नपाण्याविना उपाशी राहिले. त्यामध्ये अनेकांचा मृत्यूही झाला. देवीला या करुणा आली. तिने आपल्या अंगातून असंख्य शाक भाज्या उत्पन्न केल्या. त्या भूकेलेल्यांना खाऊ घातल्या. त्यामुळे अनेक लोक दुष्काळातूनही वाचले. त्यामुळे या देवीला 'शाकंभरी' हे नांव मिळाले.
हरिद्वार- केदार रस्त्यावर कुमाऊॅं टेकडीवर देवीने एक हजार वर्षे केवळ शाकभाज्या खाऊन तपश्चर्या केली. त्यामुळे या देवीला ‘शाकंभरी देवी' या नावाची प्रसिद्धी मिळाली. महाभारताच्या वनपर्वात आणि पद्मपुराणात त्याबाबतचे संदर्भ आढळतात असे सांगितले जाते.
शाकंभरीदेवीची पौराणीक कथा अशी की, फार पूर्वींच्या काळी दुर्गम नावाच्या दैत्याने घोर तपःचर्या करुन ब्रह्मदेवांकडून वेद मागून घेतले. त्यामुळे ब्राह्मणांना वेदांची विस्मृती झाली. होमहवन आदि सर्व बंद पडले. त्यामुळे पाऊसाचा अभाव झाला. पृथ्वी शुष्क झाली. धान्य, फळे आदिसर्व उत्पन्न होईना. दुष्काळ पडला. तेव्हां ब्राह्मणांनी व देवांनी निराहार राहून भगवती देवीची उपासना आरंभली.
भगवती प्रसन्न व्हावी म्हणून तीची स्तोत्र, स्तुती, जपजाप्य ह्यांनी उपासना केली. तेव्हां भगवती जगदंबा त्यांना प्रसन्न झाली. तीने सर्वांसाठी शाक (भाज्या) फळे निर्माण केली. तीच्या कृपेने परत पाउस पडू लागला. परत सुबत्ता निर्माण झाली. भगवतीने भाज्या व फळे यांचा वर्षाव केला म्हणून तिचे नाव शाकंभरी असे पडले.
संबंधित बातम्या