गुरुवार १८ जानेवारी २०२४ पासून शाकंभरी नवरात्रोत्सव प्रारंभ होत आहे. दक्षिण भारतात शाकंभरी मातेला बनशंकरी देवी असेही म्हणतात. शाकंभरी हे पार्वतीचे रूप आहे. पौष महिन्यातील पौर्णिमा हा शाकंभरी देवी अवतार दिन, शाकंभरी जयंती म्हणून साजरा केला जातो. हिंदू कॅलेंडरनुसार, शाकंभरी नवरात्रीची सुरुवात अष्टमी तिथीला होते आणि पौष महिन्यात पौर्णिमा तिथीला समाप्ती होते. हा आठ दिवसाचा उत्सव साजरा केला जातो आणि शाकंभरी पौर्णिमा हा शाकंभरी नवरात्रीचा शेवटचा दिवस असतो.
शाकंभरी नवरात्रोत्सव प्रारंभ १८ जानेवारी २०२४ गुरुवारी होत असून, २५ जानेवारी २०२४ गुरुवार रोजी समाप्त होईल. प्रतिवर्षी पौष महिन्यात अष्टमी ते पौर्णिमा शाकंभरीचे नवरात्र हा उत्सव साजरा केला जातो. शाकंभरी सिंहावरती विराजमान होऊन आठ हातामध्ये विविध आयुध धारण करते. शाकंभरी ही तशी सर्वसामान्य शेतकऱ्यांची देवी मानली जाते. आपल्या शरीरावर सर्व प्रकारची शाक अर्थात भाज्या पाने , फुले , फळे धारण केलेली देवी असे तिचे वर्णन केले जाते.
या देवीची पौर्णिमाही याच पद्धतीने खास असते. या हंगामात पिकणाऱ्या किमान ६० प्रकारच्या भाज्याचा भोग देवीला दाखवण्याची परंपरा आहे. हा भोग देखील सूर्योदयापूर्वी दाखवला जातो. या विविध प्रकारच्या भाज्यांमध्ये बहुतांश रानटी भाज्या या शरीरासाठी अत्यंत गुणकारी आणि औषधी असल्याने किमान वर्षातून एकदा तरी त्या पोटात जाव्यात हा यामागचा उद्देश असतो. राज्यभरातील अनेक मंदिरात देवीला हा भोग लावला जातो.
बनशंकरी ही अनेकांची कुलदेवी आहे. ज्यावेळी अनेक वर्षांचा मोठा दुष्काळ पडला, तेव्हा ऋषीमुनींनी आणि देवांनी जगदंबेची प्रार्थना केली. त्यावेळी जगदंबेने प्रकट होऊन स्वतःच्या शरीरातून शाक भाज्या निर्माण करून जगाचे पोषण केले, म्हणून तिला शाकंभरी असे नाव मिळाले. शाकंभरीलाच बनशंकरी म्हणजे वनामध्ये राहणारी देवी असेही म्हटले जाते.
सकाळी आंघोळीनंतर स्वच्छ वस्त्रे परिधान करून चौरंगावर लाल कपडा पसरवावा.
दुर्गेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करा. आता शाकंभरी देवीचे स्मरण करा. हळद, कुंकू, अक्षदा, सौभाग्याच्या वस्तू अर्पण कराव्यात.
शाकंभरी देवी ही वनस्पतीची देवी मानली जाते. त्यांच्या पूजेमध्ये ताजी फळे आणि भाज्या अर्पण करणे महत्वाचे आहे.
शाकंभरी देवीच्या या मंत्राचा जप करा. शाकंभरी नीलवर्णानीलोत्पलविलोचना। मुष्टिंशिलीमुखापूर्णकमलंकमलालया।।
शाकंभरी देवीची कथा ऐका आणि मग आरती करा. यानंतर गरजूंना फळे, भाज्या, अन्नधान्य आणि जल दान करा, यामुळे देवीच्या उपासनेचे फळ लवकर मिळण्यास मदत होईल. घरात अन्न आणि पैशाची कमतरता भासणार नाही.