कागलच्या घाटगे घराण्यात छत्रपती शाहू महाराजांचा जन्म झाला. २६ जून १८७४ साली शाहू महाराज महाराष्ट्राला आणि देशाला लाभले. त्यांचे मूळ नाव यशवंत, त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव (आप्पासाहेब) तर आईचे नाव राधाबाई होते. शाहू महाराजांचा राज्यारोहण समारंभ ०२ एप्रिल १८९४ रोजी झाला. राज्याभिषेकाच्यानंतर जळपास २८ वर्ष शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानाचा गाडा अत्यंत वेगाने आणि विकासाने हाकला.
शाहू महाराजांचं प्राथमिक शिक्षण ब्रिटिश अधिकारी फ्रेजर यांच्या हाताखाली झालं. पुढील शिक्षण राजकोटच्या राजकुमार कॉलेजमध्ये आणि धारवाड इथंही झालं. योग्य अभ्यास आणि व्यवहारज्ञान यांनी शाहू महाराजांचं जीवन समृ-द्ध केलं. मात्र त्यांची खरी कसोटी लागली ती १८९६ साली आलेल्या प्लेगच्या भयंकर साथीच्या वेळेस. मात्र शाहू महाराज त्यातही खरे उतरले आणि त्यांनी दुष्काळ आणि प्लेगच्या साथीचा सामना यशस्वीपणे केला. दुष्काळी कामं, स्वस्त धान्यदुकानं, निराधारांना आश्रमाची व्यवस्था अशी अनेक कामं शाहू महाराजांनू केली. या कामी त्यांनी तिजोरी आखडती घेतली नाही.शाहू महाराजांनी केलेली ही कामं पाहाता त्यांच्यासारखा राजा होणे नाही असं मुख्यत्वे गोरगरीब, वंचित घटकातल्या लोकांना वाटू लागलं.
शाहू महाराजांनी कोल्हापूरच्या सर्वांगिण विकासाकडेही लक्ष दिलं. शेतकरी जगला पाहीजे हेच ध्येय त्यांनी उराशी बाळगत शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून दिली.त्याशिवाय शेतीला आणि कोल्हापुरातल्या जनतेला पाण्याची कमतरता राहू नये म्हणून त्यांनी राधानगरी धरणाची उभारणी केली. याशिवाय शाहू महाराजांनी ‘शाहू छत्रपती स्पिनिंग अँड वीव्हिंग मिल’, शाहुपुरी व्यापारपेठ, शेतकऱ्यांची सहकारी संस्था, शेतकी तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी ‘किंग एडवर्ड अॅग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट’ इत्यादी संस्था कोल्हापुरात उभारल्या.
शाहू महाराजांनी सुमारे २८ वर्षे राज्यकारभार केला. शाहू राजांना बहुजनांच्या शिक्षणाविषयी तळमळ होती. म्हणूनच शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात सक्तीच्या मोफत शिक्षणाचा कायदा केला. जिथं लोकवस्ती ५०० ते १००० आहे अशा गावांमध्ये शाहू महाराजांनी शाळा काढल्या. त्यावेळेस शिक्षणासाठी पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यास धजत नसत. मग अशा पालकांना वठणीवर आणण्यासाठी जो मुलगा शाळेत येणार नाही त्याच्या पालकांना दंड स्वरूपात महिना एक रुपया भरावा लागेल असा आदेशच काढला. तसा कायदाही त्यांनी अमलात आणला. याशिवाय गोरगरीब जनतेला शिक्षण मिळावं म्हणून शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत असल्याचंही जाहीर केलं.
शाहू महाराजांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या शिक्षणासाठी सहकार्य केलं त्याशिवाय डॉ आंबेडकरांच्या मूकनायक या वृत्तपत्रासाठीही शाहू महाराजांनी त्यांना मदत केली होती. याशिवाय त्यांनी चित्रकार आबालाल रहिमान यांच्यासारख्या कलावंतांना राजाश्रय देऊन प्रोत्साहन दिलं होतं. शाहू महाराजांना 'राजर्षी' ही उपाधी कानपूरच्या कुर्मी क्षत्रिय समाजाने दिली होती.
संबंधित बातम्या